Mantralaya News: राज्यातील अनेक लोक आपली कामं घेवून मंत्रालयात येत असतात. त्यांना दुपारनंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो. दुपारी दोननंतर सर्वसामान्यांसाठी मंत्रालयाचे दरवाजे खुले केले जातात. मात्र या वेळीत आता बदल करण्यात आला आहे. नागरिकांची होणारी गैर सोय. मोठ मोठ्या रांगा. यामुळे वेळही वाया जातो. त्यामुळे यात सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सोयीस्कर होईल या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला आहे. यामध्ये आता दोन गटात विभागणी ही करण्यात आली आहे.
सरकारने नव्याने काढलेल्या शासन निर्णयात आता सर्वसामान्य नागरिकांनी दुपारी 2 ऐवजी 12 वाजता प्रवेश दिला जाणार आहे. तर जेष्ट नागरीक आणि दिव्यांगांसाठी दुपारी 2 वाजता प्रवेश दिला जाईल. शासन निर्णयात सरकारने म्हटले आहे की, मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड इ. शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. तसेच, सर्वसाधारण अभ्यागतांना प्रवेशासाठी वेळोवेळी लागू केलेल्या नियमांचे अटी व शर्तीचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दु.12 वा. प्रवेश देण्यात यावा. तर दुपारी 2 नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील. वकील व त्यांचेसोबतचे न्यायालयीन लिपिक यांना विविध विभागात अपिल व इतर न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने वैध दस्तावेज तपासून सकाळी 10 वाजता नंतर प्रवेश देण्यात यावा असं म्हणण्यात आलं आहे.
या निर्णयामुळे मंत्रालयात दोन वाजता होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व सामान्यांच्या मोठ्या रांगा दोननंतर दिसतात. त्या काही अंशी कमी होतील. आता मंत्रालयात दोन तास आधीच प्रवेश मिळणार असल्यानं सर्वसामान्यांना हा दिलासाच म्हणावा लागेल. याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयात काम निमित्त राज्यभरातून लोक येत असतात. त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.