
Cabinet Decision : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची तब्बल 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनाही आता या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणारी पदांची संख्या पुढील प्रमाणे आहे. पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. पोलिस शिपाई यांची अनेक पदं रिक्त होती. त्यामुळे ती पदे भरण्याची मागणी वारंवार होत होती.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world