Anand Dighe death story: सुमारे अडीच दशकांपूर्वी ठाण्यात एक असा व्यक्ती राहत होता, जो चुका करणाऱ्यांची किंवा चुकीचे पाऊल उचलणाऱ्यांना त्याच्या चाबकाने फोडून काढण्यास मागे-पुढे पाहात नसे. त्याला ना कायद्याची पर्वा होती, ना पोलिसांची भीती. 26 ऑगस्ट 2001 रोजी जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण रुग्णालयाला आग लावली, अनेक वाहने पेटवून दिली, पत्रकारांना मारहाण केली आणि पोलिसांनाही लक्ष्य केले. त्या व्यक्तीचं नाव होतं आनंद दिघे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू. एक पत्रकार म्हणून मी दिघे यांच्या निधनाची बातमी सर्वात आधी ब्रेक केली होती आणि त्यानंतर ठाणे शहराची जी अवस्था झाली, ती जवळून पाहिली.
ठाण्याचे किंगमेकर आणि बाळासाहेबांचे विश्वासू
आनंद दिघे हे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असले तरी पक्षातील त्यांचा दबदबा खूप मोठा होता. पक्षाच्या सुरुवातीच्या काळापासून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. ठाण्यासह मुंबईच्या आसपासच्या भागात शिवसेना रुजवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. ते बाळासाहेबांना नेते मानत असले तरी ठाण्यात त्यांचा दरारा बाळासाहेबांपेक्षाही मोठा मानला जात होता. दिघे यांनी स्वतः कधी कोणतीही निवडणूक लढवली नाही, पण त्यांची प्रतिमा 'किंगमेकर' अशी होती.
दिघे यांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याचे नशीब बदलले असे म्हटले जायचे. त्यांनी प्रकाश परांजपे या एका नगरसेवकाला थेट खासदार बनवले. एका मंदिराच्या पुजाऱ्याला आणि पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अचानक नगरसेवकपदाचे तिकीट दिले. त्यांचा निर्णय बाळासाहेब ठाकरेही कधी फिरवत नसत.
( नक्की वाचा : Shivsena Politics: दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय अन् आता ऑटो चालक; शिवसेनेच्या राजकारणाचा रोख नेमका कुठे? )
चाबकाचा धाक आणि धर्मवीर पदवी
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांशी किंवा चुका करणाऱ्यांशी दिघे अत्यंत कठोरपणे वागत. त्यांना शिक्षा देण्यासाठी ते आपल्या कार्यालयात चाबूक ठेवत असत, ज्याचा सर्वांनाच धाक होता. एकदा ठाण्याच्या महापौर निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या एका नगरसेवकाची हत्या झाली. त्या आरोपाखाली दिघे यांना अटक झाली होती. नंतर ते या प्रकरणातून सुटले, पण त्यांचे समर्थक त्यांना 'धर्मवीर' म्हणून ओळखू लागले. एका अधर्मी माणसाला शिक्षा देण्यासाठी दिघे तुरुंगात जाण्यास तयार झाले, अशी त्यांच्या समर्थकांची भावना होती.
एकनाथ शिंदेंच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा
एकनाथ शिंदे यांना राजकारणात पूर्णपणे सक्रिय करणारे आनंद दिघेच होते. ऐंशीच्या दशकात साताऱ्यातील एका तलावात आपल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर शिंदे प्रचंड नैराश्यात गेले होते. त्यावेळी दिघे यांनी त्यांची भेट घेतली, त्यांना धीर दिला आणि पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रेरित केले.
ती थरारक रात्र आणि....
26 ऑगस्ट 2001 रोजी रविवार होता. रात्री 10 च्या सुमारास मी ज्या न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो, तिथून काम संपवून घरी निघण्याच्या तयारीत होतो. तितक्यात ठाण्यातील एका छायाचित्रकार मित्राचा फोन आला की आनंद दिघे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे. आठवड्याभरापूर्वीच एका कार अपघातात जखमी झाल्याने त्यांना ठाण्याच्या सुनीतीदेवी सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बातमी खूप मोठी होती. या बातमीच्या खात्रीसाठी मी शिवसेना नेते शिशिर शिंदे यांना फोन केला. त्यांच्याकडून माहितीला दुजोरा मिळाल्यानंतर मी लगेच फोनो देऊन माझ्या न्यूज चॅनलवर बातमी ब्रेक केली. यानंतर मी माझ्या मोटरसायकलवर कॅमेरा घेऊन ठाण्याच्या दिशेने निघालो. रस्त्यात कॅमेरामन राजू इनामदार यालाही त्याच्या घरातून सोबत घेतले.
रुग्णालयाला आग आणि पत्रकारांवर हल्ला
ठाणे शहराच्या हद्दीत पोहोचताच शिवसैनिक सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचे दिसले. मुंबई-आग्रा महामार्ग त्यांनी रोखून धरला होता आणि ट्रक व ऑटोरिक्षांची तोडफोड करत होते. मी एका पोलीस चौकीच्या मागे माझी मोटरसायकल लपवली. तिथून सिंघानिया रुग्णालय सुमारे 5 किलोमीटर अंतरावर होते.
आम्ही पायीच रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. संतप्त शिवसैनिकांची नजर चुकवत आम्ही तोडफोडीची दृश्ये कॅमेऱ्यात कैद केली. आम्हाला एक रडणारा रिक्षाचालक भेटला, ज्याची रिक्षा शिवसैनिकांनी जाळून टाकली होती. मी त्याला एका बाजूला नेऊन त्याची मुलाखत घेतली.
लपत-छपत आम्ही हायवेच्या कॅडबरी नाक्यापर्यंत पोहोचलो, जिथून सिंघानिया रुग्णालय अत्यंत जवळ होते. दरम्यान, ठाण्यातील इतर पत्रकार मित्रांचे फोन येऊ लागले की तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या संशयावरून शिवसैनिकांनी संपूर्ण रुग्णालयच पेटवून दिले होते. तिथे रिपोर्टिंग करायला गेलेल्या स्थानिक पत्रकारांनाही अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यांची वाहने जाळली गेली.
मृत्यूच्या दाढेतून सुटका
काही लोकांनी मला परत फिरण्याचा सल्ला दिला. मी माझ्या ब्यूरो चीफला संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी कॅमेऱ्यातील मूळ टेप काढून माझ्या खिशात ठेवली आणि दुसरी टेप कॅमेऱ्यात घातली. अशा परिस्थितीत पुढे जायचे की नाही याचा मी विचार करत असतानाच समोरून शिवसैनिकांचा जमाव आला आणि त्यांनी एका बसला आग लावली.
कॅमेरामन राजू इनामदार एका होर्डिंगच्या पाठीमागे लपून त्या आगीचे शॉट्स घेऊ लागला. तितक्यात एका दंगेखोराची नजर त्याच्यावर पडली. त्याने त्याच्या साथीदारांसह राजूला फरफटत बाहेर काढले आणि काठ्यांनी मारहाण सुरू केली. मी राजूला वाचवण्यासाठी गेलो तर माझ्यावरही हल्ला झाला. दंगेखोरांनी राजूच्या हातातील कॅमेरा हिसकावून पेटत्या बसमध्ये फेकून दिला आणि आमच्यावर लाथा-बुक्के व काठ्यांचा वर्षाव सुरू केला. हे सर्व सुनीतीदेवी सिंघानिया शाळेच्या गेटसमोर घडत होते.
माझ्यापेक्षा राजूला जास्त मार बसत होता. अचानक राजू बेशुद्ध होऊन पडला. मला वाटले की तो बहुदा गेला. मीही त्याच्या शेजारी डोळे बंद करून पडून राहिलो. दंगेखोरांना वाटले की दोघेही मेले आहेत, म्हणून त्यांनी मारहाण थांबवली आणि ते पुढे निघून गेले.
भीषण रात्रीनंतरचा सुटकेचा निश्वास
काही मिनिटांनी मला कोणीतरी हलवले. "चल, लवकर पळूया इथून" – हा राजू इनामदारचा आवाज होता. राजू जिवंत असल्याचे पाहून मला झालेला आनंद शब्दात सांगता येणार नाही. शिवसैनिकांच्या मारहाणीत तो रक्ताने माखला होता, पण त्याने प्रसंगावधान राखून मेल्याचे नाटक केले, ज्यामुळे मारहाण थांबली होती. यानंतर आम्ही शाळेचे गेट ओलांडून मैदानात पोहोचलो आणि तिथे उगवलेल्या लांब गवतात बऱ्याच वेळ लपून राहिलो. दंगेखोर निघून गेल्याची खात्री झाल्यावर आम्ही भिंतीवरून उडी मारून बाहेर पडलो.
आम्ही पायी चालत पुन्हा पोलीस चौकीकडे गेलो जिथे मोटरसायकल लपवली होती. रस्त्यात शैलेश मुळे आणि विजयानंद गुप्ता हे दोन छायाचित्रकार भेटले, त्यांनी आम्हाला पाणी पाजले. त्यानंतर मोटरसायकलवरून आम्ही मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी पोहोचलो. मला किरकोळ दुखापत झाली होती, पण राजूच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली, ज्यावर पुढील 10 वर्षे उपचार सुरू होते.
आनंद दिघे यांच्या निधनानंतर आजही अनेक उलटसुलट चर्चा रंगतात की त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नाही तर तो एक कट होता. ठाणे पोलिसांनी या हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली केवळ थातूरमातूर कारवाई केली आणि कोणालाही शिक्षा झाली नाही. दिघे यांनी लग्न केले नव्हते. त्यांचा एक पुतण्या आहे, जो त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यासोबत नसून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे.