Shivsena Politics: शिवसेनेचा जन्म साठच्या दशकात भाषावादाच्या राजकारणाच्या आधारावर झाला होता. ऐंशीच्या दशकात शिवसेनेने धर्मआधारित राजकारण करण्यास सुरुवात केली असली, तरी पक्षाने मराठीवादाशी स्वतःला जोडून ठेवण्याचा प्रयत्न कायम ठेवला. याच कारणामुळे शिवसेनेचा गेल्या चार दशकांचा इतिहास पाहिला, तर हा पक्ष हिंदुत्ववाद आणि मराठीवाद यांच्यात अडकलेला दिसतो आणि या मुद्द्यांवर पक्षांत अंतर्विरोध पाहायला मिळतो.
ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आणि सध्याचे वादळ
महाराष्ट्रात सध्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा मुद्दा तापला आहे. जो ड्रायव्हर मराठी बोलू शकणार नाही, त्याचा परवाना (परमिट) रद्द केला जाईल असा नियम शासनाकडून करण्यात आला आहे. परिवहन विभाग या नियमाची अंमलबजावणी करत आहे.
राज्यातील महायुती आघाडी सरकारमध्ये परिवहन विभाग शिवसेनेकडे आहे. ही तीच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, ज्यांना 2022 च्या बंडांनंतर सध्या खरी शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली आहे. या नियमामुळे उत्तर भारतीय असणारे आणि ज्यांची मातृभाषा हिंदी आहे, असे ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक प्रभावित होत आहेत. शिवसेनेचा इतिहास तपासल्यास असे दिसते की, या पक्षाने उत्तर भारतीयांना कधी जवळ केले, कधी डोक्यावर घेतले, तर कधी त्यांना मारहाणही केली.
दक्षिण भारतीयांविरोधातील सुरुवातीची आंदोलने
साठच्या दशकात शिवसेनेने स्थानिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हा मुंबईत स्थायिक झालेले दक्षिण भारतीय हे शिवसेनेचं लक्ष्य होते.
दक्षिण भारतीय सुशिक्षित नागरिक बँकांमध्ये, खाजगी कंपन्यांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाचा हक्क हिरावून घेत आहेत, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मत होते. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून दक्षिण भारतीय लोकांना मारहाण करून मुंबईतून पळवून लावण्याची मोहीम सुरू झाली.
कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमेचा उदय
हिंसक भाषिक राजकारणाद्वारे शिवसेना चर्चेत तर आली आणि एक राजकीय ताकद म्हणून स्वतःला प्रस्थापित केले. परंतु मराठीवादाचा मुद्दा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांबाहेर चालत नव्हता. पक्षाच्या विस्तारासाठी ठाकरेंना दुसऱ्या एखाद्या मुद्द्याचा शोध होता. ऐंशीच्या दशकात हा मुद्दा हिंदुत्ववादाच्या रूपाने मिळाला.
मुंबईच्या जवळच असलेल्या भिवंडीत तेंव्हा भयानक जातीय दंगल झाली. ठाकरेंच्या आदेशावरून शिवसैनिक त्या दंगलीत उतरले. त्या दंगलीने शिवसेनेला एक नवी ओळख दिली. एक कट्टर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी पक्ष अशी शिवसेनेची ओळख निर्माण झाली. दरम्यानच्या काळात शिवसेनेने भाजपसोबत युती केली आणि रामजन्मभूमी आंदोलनातही सहभाग घेतला. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशिद पाडण्याचे श्रेयही ठाकरेंनी जाहीरपणे आपल्या शिवसैनिकांना दिले, ज्यामुळे शिवसेनेची कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणखी भक्कम झाली.
उत्तर भारतीयांना जवळ करण्याचे प्रयत्न
हिंदुत्ववाद स्वीकारल्यानंतर ठाकरेंनी महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेच्या विस्ताराची योजना आखली. या योजनेअंतर्गत सर्वात आधी हिंदीभाषिकांना सोबत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णयाचा एक भाग म्हणून ठाकरेंनी फेब्रुवारी 1993 मध्ये आपल्या पक्षाचे मुखपत्र 'दैनिक सामना'ची हिंदी आवृत्ती 'दोपहर का सामना' सुरू केली, जी आजही प्रकाशित होते.
या हिंदी वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी संजय निरुपम या बिहारी पत्रकाराची नियुक्ती केली. इतकेच नाही तर त्यांनी निरुपम यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली. निरुपम यांनी ठाकरेंच्या सांगण्यावरून डिसेंबर 1996 मध्ये मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्तर भारतीय महासंमेलनाचे आयोजन केले, जिथे ठाकरेंनी हजारो उत्तर भारतीयांच्या सभेला हिंदीतून संबोधित केले.
'मी मुंबईकर' मोहीम आणि कल्याणातील हिंसाचार
बिगर मराठी भाषिकांना सोबत घेण्याची बाळासाहेब ठाकरेंची मोहीम त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनीही सुरू ठेवली. त्यांनी 2003 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाती घेतली. उद्धव यांनी हा संवाद वाढवण्यासाठी 'मी मुंबईकर' नावानं मोहीम सुरू केली. आता शिवसेना भाषावादाच्या राजकारण सोडलंय असे सर्वांना वाटत होते, पण त्याच वेळी मुंबईजवळील कल्याण येथे अशी एक घटना घडली ज्याने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना तडा गेला.
त्यावेळी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीची परीक्षा देण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या तरुणांना मारहाण करून पळवून लावण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. उद्धव या हिंसेशी सहमत नसले, तरी ही हिंसा शिवसेनेच्या बॅनरखालीच होत होती.
पक्षातील फूट आणि राज ठाकरेंची एक्झिट
कल्याणमध्ये झालेल्या हिंसाचारानं शिवसेनेच्या बदललेल्या प्रतिमेचे मोठे नुकसान केले. संजय निरुपम यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा हिंसाचार हे पक्ष सोडण्याचं एक कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. 2005 मध्ये राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली आणि उघडपणे मराठी भाषिकांना केंद्रीत राजकारण करण्यास सुरुवात केली.
शिंदे गटाचे राजकारण आणि अंतर्विरोधाचा पेच
जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडली, तेव्हा तेसुद्धा मराठीवादाऐवजी हिंदुत्ववादाबाबत बोलत होते. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुस्लिमांचे तुष्टीकरण करत होते आणि त्यांच्यामुळे पक्षाच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचे नुकसान झाले, असे शिंदे यांचे म्हणणे होते. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेत मिलिंद देवरा, शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्यासारख्या बिगरमराठी नेत्यांना पक्षात घेतले आहे.
मात्र ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य करून त्यांचा पक्ष पुन्हा एकदा भाषिक राजकारण करताना दिसत आहे.गंमतीची गोष्ट म्हणजे, शिवसेना एकसंघ असताना जे संजय निरुपम भाषावादाला विरोध करत होते, तेच आता या शिवसेनेत असूनही भाषावादाचं राजकारण करत आहेत. एकूणच हिंदुत्ववाद आणि मराठीवाद यांच्यात अडकलेल्या शिवसेनेत अंतर्विरोध सुरूच आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world