विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनात काँग्रेस आमदारांची घुसमट दिसून येत आहे. काँग्रेसचे आमदार नाराज असून कुठल्याच चर्चेत सहभागी करून घेतलं जातं नसल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे एकजूट दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा सुरु असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत कलह वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस काँग्रेस विधीमंडळ पक्षासाठी महत्वाचा समजला जात आहे.
काँग्रेस पक्षात सध्या नाराजीनाट्य जोरदार सुरु आहे. दिल्लीत पक्षश्रेष्टींकडे तक्रार ते थेट विधानभवनापर्यंत हे नाराजी नाट्य सुरु आहे. काही आठवड्यान आधी दिल्लीत एक बैठक पार पडली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केल्या गेल्या. मात्र इथे विधान भवनात वेगळीच गळचेपी आमदारांची सुरू असलेली पाहायला मिळत आहे. तसा नाराजीचा सुरू काही काँग्रेस आमदारांनी काढला आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले हे आमदारांना कुठल्याच चर्चेत सहभागी करून घेत नाहीत असा आरोप होत आहे. सभागृहात बोलूनही देत नसल्याचा आरोप काही आमदारांनी केला आहे. मात्र केवळ वरिष्ठ आमदारांना नाही तर नवोदित आमदारांना देखील काँग्रेस कायम संधी देत असतं. जे आमदार उपस्थित राहात नाहीत त्यांच्याकडून असे आरोप केले जात असल्याचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर आता उद्या बुधवारी पक्षातील आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. सोबतच त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जाईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण परिस्थिवर सारवासारव करत त्यांनी सर्व बाबी विधानसभा अध्यक्षांवर ढकलल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष विरोधकांना बोलू देत नाही असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाना डॅमेज कंट्रोलचं काम कराव लागणार आहे. जर असंच नाराजी नाट्य सुरु राहील तर मात्र पक्षात मोठे बदल देखील होऊ शकतील. या संदर्भात उद्या बुधवारी विजय वडेट्टीवार यांनी बैठक देखील बोलवल्याची माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत आमदारांची नाराजी दूर होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. शिवाय आमदारांच्या नक्की तक्रारी काय आहेत हे ही पक्षाकडून समजावून घेतलं जाणार आहे.