
महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने सध्या राज ठाकरे यांना जवळ केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येवू शकतात अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने चर्चाही सुरू आहे. अशा वेळी महाविकास आघाडीत फूट फडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत एन्ट्री होणार याचीही चर्चा रंगली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला स्पष्टीकरण दिलं आहे. ते राज ठाकरे यांच्या मविआतील प्रवेशाबाबत स्पष्टच बोलले आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न इथं नाही. परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत. असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व निशिकांत दुबेच्या वादग्रस्त वक्तव्यावर रमेश चेन्नीथला दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या प्रश्नावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही,त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे मविआमधील उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या जवळ जात आहे. मुंबई महापालिका ठाकरेंसाठी महत्वाची आहे. त्यामुळे काही झाले तरी मुंबई महापालिका जिंकायची असा चंग ठाकरेंनी बांधला आहे. त्यामुळे ते कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. वेळी ते मविआतून बाहेर पडण्याच्या ही तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी मनसेला ही सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांबाबतची भूमीका काँग्रेसला पटणारी नाही. त्यामुळे मनसेच्या मविआ प्रवेशाची चर्चाच काँग्रेसमध्ये सध्या नाही.
दरम्यान निवडणुकीतील घोटाळ्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 75 लाख मतदान कसे वाढले, हाच प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग हा भाजपासाठी काम करत असून निवडणुकीत कूकर्म करून विजय मिळवला आहे. आता बिहारमध्येही तेच सुरु आहे. बिहारमध्ये 2 कोटी मतदारांचा प्रश्न आयोगाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे. आयोग हे सर्व भाजपाला फायदा व्हावा यासाठी करत आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता हवी पण आयोगाची भूमिकाच संशयास्पद आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागू असेही चेन्नीथला म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world