केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडचा दौरा केला. पण या दौऱ्या पेक्षा चर्चा झाली ती रायगडच्या पालकमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची. त्यामुळे महायुतीत खरोखरच सर्व काही ठिक चाललं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांनी मात्र महायुतीवर टिका करण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा छेडला आहे. शिवाय लाडकी बहीणीला कसे चार महिने पालकमंत्रिपदापासून वंचित ठेवलं आहे असं ही ते म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रायगडच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यात अजूनही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नाही. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. मराठ्यांची राजधानी रायगड किल्ला आणि रायगड जिल्ह्याचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना जाहीर करण्यात आलं. पण नंतर त्याला स्थगिती देण्यात आली. एका महिला मंत्र्यावर कसा अन्याय केला जातोय याचे हे उत्तम उदाहरण आहे असंही जयंत पाटील या निमित्ताने म्हणाले.
गेल्या चार महिन्यापासून पालकमंत्रिपदापासून त्यांना दूर ठेवलं जातं. एका जिल्ह्याला चार महिन्यापासून पालकमंत्री नाही. त्यामुळे त्या जिल्ह्याचा विकास होत नाही. तो जिल्हा विकासापासून दूर राहातो. हे सर्वजण पाहात आहेत. पण त्याचं महायुतीच्या नेत्यांना काही पडले नाही. लाडकी बहीण लाडकी बहीण असं सगळीकडे सांगितलं जातं. पण मंत्रिमंडळातील लाडक्या बहीणीबाबत यांची भूमीका वेगळी आहे अशी टिका ही त्यांनी केली.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपावरून अजित पवार यांची तक्रार केली असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिले आहे. अशा बातम्या बाहेर येत असतात. नक्की त्यांच्या अंतर्गत वाद काय आहे हे लवकरच बाहेर येईल. पण नाराजी लपून राहीलेली नाही असंही ते म्हणाले. दरम्यान अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगड पालकमंत्रिपदाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदेंची नाराजी मार्गी लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.