राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. अजित पवार यांनी आपले काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फारकत घेत आपला गट वेगळा करुन पक्षावर आपला दावा सांगितला. अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात महायुती सरकारमध्ये स्थापन होण्याचा निर्णयही घेतला. परंतु या निर्णयानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दीक चकमकी उडताना पहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे नेते आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत बोलताना अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे ठाण्याचे नेते आनंद परांजपे यांनी आव्हाड यांचा उल्लेथ सूर्याजी पिसाळ असा केला आहे.
नवी मुंबई आणि कळवा येथील सभेत बोलत असताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बहिण-भावाच्या नात्याबद्दल भाष्य केलं. त्यांच्या या विधानाचे साहजिकच पडसाद उमटले आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरीही त्यांच्यातील भावा-बहिणीच्या नात्यावर प्रश्न उभे केले जाऊ नयेत. आम्ही देखील आव्हाडांना तुमच्या बहिणीसोबतचे संबंध कसे आहेत असं विचारू शकतो असा प्रश्न परांजपे यांनी विचारला.
अजित पवार राष्ट्रवादीतले सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे -
जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर कार्यक्रमात जे अकलेचे तारे तोडले त्याचा मी निषेध करत असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे आव्हाड यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले. आव्हाड हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे असल्याची जहरी टीकाही यावेळी आनंद परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांना आता शुद्धीत येण्याची गरज असल्याचंही आनंद परांजपे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ठाणे जिल्ह्यातली ताकद कमी केली. १९९९ साली पक्षाची स्थापना झाल्यानंतर अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं पक्षात योगदान अधिक आहे. यांना प्रश्न विचारावेत एवढीही पात्रता आव्हाड यांची नसल्याची टीका परांजपे यांनी केली.
याच पत्रकार परिषदेत बोलत असताना अन्य मुद्द्यांवरही परांजपे यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला. काही वर्षांपूर्वी गाजलेला पहाटेचा शपथविधी कोणामुळे झाला, राज्यातली राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठली गेली, २०२२ साली कोणत्या चर्चा झाल्या हे प्रश्न आव्हाडांनी शरद पवार यांना विचारणं गरजेचं आहे असं परांजपे म्हणाले. आव्हाड हे पूर्वी इतिहासातले तज्ज्ञ होते आता ते रामदास पाध्ये किंवा जॉनी लिव्हर यांच्यासारखे नकलाकार झाले असतील तर मला माहिती नाही असा खोचक टोलाही परांजपे यांनी आव्हाड यांना लगावला.