Kalyan-Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना भाजपमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजपने स्थायी समिती सभापती पदावर दावा सांगितला आहे. एकीकडे सभापती कोण होणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे पहिल्यांदाच केडीएमसीच्या इतिहासात महिलेला स्थायी समिती सभापती पद मिळणार का? अशी चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपची एक मागणी मान्य....
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची नियुक्ती काल पार पडलेल्या महासभेत करण्यात आली. सगळ्यांची नजर स्थायी समिती सदस्य निवडीवर होती. शिवसेना शिंदे गटाकडून गजानन पाटील, महेश गायकवाड, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे यांची नियुक्ती झाली. भाजपचे दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर आणि शिवसेना ठाकरे गटाचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती पद म्हणजे केडीएमसीच्या तिजोरीच्या चाव्या या सभापतीकडे असतात. महापौर पद शिंदे सेनेला, उपमहापौर पद भाजपकडे गेले आहे. भाजपचा दोन पदांवर दावा होता. सभागृह नेते पद आणि स्थायी समिती सभापती पद. सोमवारी पार पडलेल्या महासभेत सभागृह नेते पदी भाजपचे वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपची एक मागणी मान्य झाली.
स्थायी समिती सभापदी पद कुणाला?
स्थायी समिती सभापती पद आता शिवसेनेकडे जाणार की भाजप पुन्हा यासाठी राजकीय रणनीती आखणार. या दोन्ही पक्षाने तीन महिलांना स्थायी समितीमध्ये पाठविले आहे. शिवसेनेने एक तर भाजपने दोन नगरसेविका पाठविले आहे. स्थायी समिती सभापती पदांसाठी महेश गायकवाड, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी यांची नावे चर्चेत आहे. तर भाजपला हे पद गेले तर दिपेश म्हात्रे, मंदार हळबे यांची नावे देखील चर्चेत आहेत. परंतू एक चर्चा आहे की, यंदा सभापती पद लाडक्या बहिणीला दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कारण शिवेसना शिंदे गटाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापौर पदी लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. यंदा स्थायी समिती सभापती पदी लाडक्या बहिणीला मान दिला जाऊ शकतो. हा मान दिला तर केडीएमसीच्या इतिहासात प्रथमच महिला नगरसेविका स्थायी समिती सभापदी विराजमान होऊ शकते.