Kalyan News : सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे डोंबिवलीतील काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कल्याणमधील काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली. ही टीका करत असताना त्यांची जीभ घसरली. त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.
काय म्हणाले पगारे?
कल्याणमधील काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना नामर्द लोकं संघात गेले, अशी टीका पगारे यांनी केली. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्येच त्यांनी ही टीका केली. पगारे यांनी यावेळी भाषण करताना एक शेर हिंदीमध्ये ऐकवला. त्यावेळी ते म्हणाले की,
आजादी की जंग मे दो तरह के लोग थे
जो मर्द थे वो जेल मे गये, जो नामर्द थे वो संघ मे गये
त्यांच्या या कडवट टीकेला स्टेजवरील काँग्रेसच्या नेत्यांनी भरभरुन दाद दिली.
(नक्की वाचा: Amit Shah: मुस्लीम लोकसंख्या का वाढली? अमित शाहांनी सांगितलं कारण, 'डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट' चा दिला मंत्र )
प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर उचललं
यापूर्वी आज (शनिवार, 11 ऑक्टोबर) काँग्रेस पक्षाच्या वतीन कल्याणमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसविली होती. या कृत्याच्या निषेधार्थ कल्याणच्या पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे सहभागी झाले होते.
काँग्रेस आंदोलनाच्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सपकाळ पोहचले. त्यांनी मामा पगारे यांना खांद्यावर उचलून घेतले. तसंच त्यांचा कोट घालून सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी पगारे यांची मोबाईल कॉल वरून विचारपूस करीत काँग्रेस पक्ष पाठिशी असल्याचे पगारे यांनी सांगितले होते. त्यापाठोपाठ सपकाळ यांनी पगारेंना खांद्यावर उचलून स्टेजवर नेले. सपकाळ यांनी या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. पण, त्यांच्या भाषणापेक्षाही मामा पगारे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीका ही चर्चेचा विषय बनली. या विषयावर भविष्यातही राजकारण पेटण्याची शक्यता आहे.