शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातला कल्याण पश्चिमेतील वाद आता चिघळायला लागला आहे. एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसू नका नाही तर असा थेट इशारा शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिला होता. त्याला आता भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे. पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आल्यानंतर भाजपनेही त्याच भाषेत उत्तर दिले आहे. त्यामुळे त्याचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटतील अशी जोरदार चर्चा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे हे महायुतीच मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? असा संतप्त सवाल भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. भिंवडी लोकसभा मतदार संघात कपिल पाटील यांच्या विरोधात शिंदे सेनेने काम केले असा आरोप पवार यांनी केला. याचे पुरावे आम्ही दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा आमच्याशी करुन नका, ते काम तुम्ही जास्त चांगले करता. तुम्ही आधी सुधारा, भाजप कधी गद्दारी करणार नाही. भाजप महायुतीचा धर्म पाळणार. अशा शब्दात शिंदे सेनेच्या नेत्यांना नरेंद्र पवार यांनी सुनावले आहे.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
विकासासाठी महायुती झाली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उत्तम काम करीत आहेत. महायुती जो निर्णय होईल, तो निर्णय भाजपला जसा लागू होतो, तोच निर्णय शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला लागू आहे. त्यामुळे अशा प्रकारची फालतू विधाने करु नका अशी अरविंद मोरे आणि त्यांच्या समर्थकांना विनंती आहे असे पवार म्हणाले. आम्ही भाजपचे काम करायचे नाही का? मी भाजपचे काम करतो. मोदी साहेबाच्या योजना आमच्या मतदार संघात राबवितो. एकनाथ शिंदे यांच्याही योजना आमच्या मतदार संघात राबवतो. पक्षाची ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणजे निवडणूकीची तयारी झाली का? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही पक्षाचे काम करतो. पक्ष ठरविणार कोणाला उमेदवारी द्यायची की नाही. महायुतीत निर्णय होईल. त्यानुसार आम्ही महायुतीचा सन्मान करणार आहे. त्यांचा जो काही निर्णय होईल. तो तंतोतंत पाळण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे. मागच्या वेळी मी आमदार होतो. माझी सिटिंग सीट असतानाही शिवसेनेला सोडली गेली. त्यामुळे स्वाभाविकपणे यावेळी मी इच्छूक आहे, अशी प्रांजळ कबूलीही पवार यांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याची पवार यांनी आपली महत्वकांक्षा बोलून दाखवली आहे.
दरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यानी शिंदे सेनेत प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी जिल्हा प्रमुख मोरे यांनी भाजपचे नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष वरुण पाटील हे कल्याण पश्चिमतून बंडखोरी करणार आहेत, असा आरोप केला होता. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसलात तर जशाच तसे उत्तर दिले जाईल असे वक्तव्य मोरे यांनी केले होते. शिवाय कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड मतदार संघा शिवसेना शिंदे गटाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही दिला होता.