जाहिरात

Assembly Election 2024 : शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?

Ambarnath Politics : आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. अंबरनाथमध्ये शिवसेनेत दोन गट तयार झाले.

Assembly Election 2024 : शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?

निनाद करमरकर, अंबरनाथ

Ambarnath Constituency :   ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक गड समजला जातो. 1990 पासून एक टर्म वगळता सातत्यानं अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. 2009 पासून अंबरनाथ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे मागील सलग 3 टर्म अंबरनाथचे आमदार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर किणीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटही अंबरनाथ विधानसभेत चांगलाच सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या घटलेल्या मताधिक्यावरून याचा अंदाज आला आहे. तर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना सोपी नसेल, हे स्पष्ट आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथ मतदारसंघातून 1990, 1995, 1999 असे सलग तीन वेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी कामगार मंत्री साबीर शेख निवडून आले. 2004 साली राष्ट्रवादीच्या किसन कथोरे यांनी साबीर शेख यांचा 8 हजार मतांनी पराभव करत आमदारकी जिंकली. पुढे 2009 साली अंबरनाथ विधानसभा अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानंतर अंबरनाथमध्ये उमेदवाराचा शोध सुरू झाला. त्यावेळेस शहरातील नावाजलेले दातांचे डॉक्टर असलेल्या डॉ. बालाजी किणीकर यांचं नाव शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सुचवलं आणि किणीकर पहिल्याच प्रयत्नात 20 हजार मतांनी निवडून येत अंबरनाथचे आमदार झाले. 2014 साली शिवसेना भाजपाने वेगवेगळी निवडणूक लढवली, आणि त्यातही भाजपाच्या राजेश वानखेडे यांचा अवघ्या 2 हजार मतांनी पराभव करत किणीकर निवडून आले. तर 2019 साली काँग्रेसचे रोहित साळवे, वंचित बहुजन आघाडीचे धनंजय सुर्वे, मनसेचे सुमेध भवार यांचं आव्हान असताना डॉ. बालाजी किणीकर हे 29 हजार मतांनी निवडून आले.

(नक्की वाचा-  Assembly Election 2024 : पिंपरीत उमेदवारीसाठी रस्सीखेच; अजित पवार गटासमोर मविआसह महायुतीचंही आव्हान)

या सगळ्यात आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. अंबरनाथमध्ये शिवसेनेत दोन गट तयार झाले. यातली ए टीम म्हणजे अरविंद वाळेकर आणि बी टीम म्हणजे बालाजी किणीकर अशी उघड चर्चा अंबरनाथ शहरात होऊ लागली. हे वाद मिटवण्याचा वरिष्ठांनी अनेकदा प्रयत्नही केलs. मात्र दोन्हीकडून एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडली जात नसल्यानं हा प्रयत्न निष्फळ ठरला. आता तर हे वाद इतके टोकाला गेले आहेत, की येत्या निवडणुकीत जागा दाखवून देण्याचा गर्भित इशाराच वाळेकर यांनी नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात कुणाचंही नाव न घेता दिला. 

एकीकडे पक्षांतर्गत गटबाजी वाढत असताना दुसरीकडे शिवसेनेतील फुटीनंतर उबाठा गटही अंबरनाथ विधानसभेत चांगलाच सक्रिय झालाय. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आली. अंबरनाथ शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वाधिक कामं करूनही श्रीकांत शिंदे यांना 93 हजार 504 मतं, तर उबाठा गटाच्या वैशाली दरेकर यांना 57 हजार 725 मतं मिळाली. मतांचा हा फरक 35 हजार 779 मतांचा होता. विधानसभा निवडणुकीतील मागील मताधिक्य पाहता यंदा या घटलेल्या मताधिक्याचा विधानसभेतही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

(नक्की वाचा - भास्कर जाधवांना गुहागरमध्ये कोणाचं आव्हान? स्वत: लढणार की मुलासाठी जागा सोडणार?)

मात्र यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा गट यांच्या महाविकास आघाडीचं आव्हान किणीकर यांच्या समोर असणार आहे. काँग्रेसमधून रोहित साळवे, सुमेध भवार, राष्ट्रवादीतून कबीर नरेश गायकवाड आणि उबाठा गटाकडून राजेश वानखेडे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. यापैकी वानखेडे यांनी 2014 साली भाजपाकडून किणीकर यांना कडवी झुंज दिली होती. तर रोहित साळवे यांनीही 2019 साली किणीकर यांच्याविरोधात चांगली मतं घेतली होती. अर्थात यंदाच्या निवडणुकीत तीन पक्षांपैकी अंबरनाथची जागा कोणत्या पक्षाला सुटते, यावरही बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक जिंकणं अशक्य नसलं, तरी सोपं मात्र नक्कीच नसेल, हे नक्की आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com