कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानपरिषदेत रम्मीचा डाव खेळताना दिसले. त्यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यांच्यावर टीका होवू लागली. महायुती सरकारला सारवासारव करताना नाकी नऊ आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इथं त्यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या समोर पत्ते उधळले. हे पत्ते कृषी मंत्र्यांना खेळायला द्या असं निवदेनही त्यांनी दिलं. मात्र त्यानंतर जोरदार राडा झाला.
सुनिल तटकरे यांच्यावर पत्ते उधळल्याने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राग आला. पत्ते उधळणाऱ्या छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. त्यांना तुफान मारहाण करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण ही आघाडीवर होते. मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या मारहाणी छावाच्या इतर कार्यकर्त्यांना ही धक्काबूकी आणि मारहाण करण्यात आली.
विजय घाडगे पाटील यांना मारहाण होत असताना पोलिस ही तिथे होते. मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. पाटील यांना तिथून बाहेर काढण्यात आलं. ज्या रेस्टहाऊसमध्ये हा प्रकार घडला त्याचे गेट बंद करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. विजय घाडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं. या प्रकरणी अजूनही कुणा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली नाही.
कृषीमंत्र्यांच्या कृतीचा आम्ही निषेध केला असं विजय घाडगे म्हणाले. पण आम्हाल मारहाण करण्यात आली. त्यांनी केलेल्या मारहाणीचा योग्य वेळी योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असं घाडगे यावेळी म्हणाले. तर निवेदन देण्यासाठी आलेल्यांचे म्हणणे आपण शांतपण ऐकून घेतले. त्यांचे निवेदन आपण घेतले. त्यांना झालेल्या मारहाणीचे आपण समर्थन करत नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले. तर आमच्या नेत्यांना शिव्या देण्यात आल्या. आम्ही काही साधूसंत नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.