ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांना दारू प्यायल्याच्या आरोपावरून काही जणांनी धक्काबुक्की केली होती. हा आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. मी दारू पीत असल्याचा एक तरी व्हिडीओ दाखवा असे आव्हान हाके यांनी दिले आहे. सोमवारी पुण्यामध्ये जबरदस्त राडा झाला होता. मराठा समाजातील काही तरुणांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना घेरले आणि हाके यांनी केलेल्या जुन्या विधानांबद्दल त्यांना जाब विचारण्याचा यावेळी या तरुणांनी प्रयत्न केला. हा प्रकार कळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
नक्की वाचा : 'मनोज जरांगे सोंगाड्या, त्याला यलो कार्ड देऊन बिग बॉसमध्ये पाठवा'; लक्ष्मण हाकेंची धक्कादायक टीका
पुण्यात काय घडले ?
लक्ष्मण हाके पुण्यातील कोंढवा परिसरात दारू पीत बसले होते असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांना घेरणाऱ्या तरुणांनी म्हटले होते की हाके हे एका टेकडीवर बियर पित बसले होते, तरुणांनी त्यांना हटकले असता हाके यांनी वाद घातला आणि शिवीगाळ केली असा आरोप आहे. यामुळे मराठा तरुणांनी आपल्या इतर साथीदारांनाही बोलावून घेतले आणि या सगळ्यांनी हाके यांना घेरल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर बोलताना लक्ष्मण हाके यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला आहे.
नक्की वाचा: लक्ष्मण हाकेंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, तक्रारीनंतर मिळाले पोलीस संरक्षण
वैद्यकीय चाचणीत काय झाले ?
आपण दारू प्यायलो होतो की नाही याची खातरजमा करण्यासाठी आपली वैद्यकीय चाचणी करण्यात यावी असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते. लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र प्राथमिक वैद्यकीय अहवालात हाके यांनी दारू प्यायली नव्हती असे स्पष्ट झाले आहे.
हाकेंचा संभाजीराजेंवर आरोप
सोमवारचा प्रकार घडल्यानंतर लक्ष्मण हाके हे मंगळवारी नागपुरात पोहोचले होते. हाके यांची चंद्रपूरमध्ये सभा होणार असून त्यासाठी ते नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, "छत्रपती संभाजीराजे यांना राजे म्हणण्याची लाज वाटते. त्यांना छत्रपती म्हणण्याची लाज वाटते. मिस्टर संभाजीराव भोसले यांनी असे भ्याड कृत्य करू नये. मारायला माणसे पाठवू नये. माझे त्यांना आव्हान आहे. " मते आणि अमित देशमाने या दोन तरुणांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हाकेंनी केला आहे. या दोघांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि संभाजीराजे यांच्या सांगण्यावरूनच हे सगळे घडल्याचा गंभीर आरोप हाकेंनी केला आहे.