जाहिरात
This Article is From Apr 23, 2024

शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!

Solapur Lok Sabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असलेल्या सोलापूरमध्ये 2 तरुण आमदारांमध्ये जोरदार लढत होणार आहे.

शिंदेंच्या लेकीला फडणवीसांच्या 'रामा' चं आव्हान!
सोलापूर:

पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असलेल्या सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला अशी सोलापूरची एकेकाळी ओळख होती. माजी मुख्यमंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा हा मतदारसंघ. पण, गेल्या 10 वर्षांपासून सोलापूरमध्ये भाजपाचा खासदार आहे.

या निवडणुकीत सोलापूर पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसनं सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिलीय. तर भारतीय जनता पक्षानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवलंय. 


प्रणितींचा राजकीय प्रवास

सुशीलकुमार शिंदे केंद्रीय मंत्री असताना प्रणिती शिंदे यांनी राजकारणात पदार्पण केलं .त्यापूर्वी जाई-जुई या संस्थेच्या मार्फत त्या सामाजिक कार्यात सक्रीय होत्या. सोलापूर मध्य मतदारसंघातून त्या 2009 साली सर्वप्रथम आमदार झाल्या. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली.  

विशेष म्हणजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाल्यानंतरही प्रणिती यांनी विधानसभेची जागा कायम राखली होती. प्रणिती भारतीय जनता पक्षात जाणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. प्रणिती यांनी वेळोवेळी या सर्व चर्चा फेटाळाल्या होत्या. त्यानंतर आता काँग्रेसनं त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन नवं आव्हान दिलं आहे.

कोण आहेत राम सातपुते?

ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार असा प्रवास राम सातपुते यांनी केलाय. मुळचे बीड जिल्ह्यातील असलेल्या सातपुते यांचे आई-वडील ऊस तोडणीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमध्ये स्थायिक झाले. सातपुते पुण्यात शिक्षणासाठी असताना त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) संबंध आला. अभाविपनंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2019 साली ते माळशिरसमधून पहिल्यांदा आमदार झाले. सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे सोलापूरची निवडणूक ही फडणवीसांच्याही प्रतिष्ठेची झाली आहे.

काय आहे सोलापुरातील परिस्थिती?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट आणि पंढरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट आणि पंढरपूर या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. मोहोळमधील राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीची बाजू आणखी भक्कम झालीय. सोलापूर मध्यमधील प्रणिती शिंदे या एकमेव महाविकास आघाडीच्या आमदार या मतदारसंघात आहेत.

सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुखभाजपा
सोलापूर मध्यप्रणिती शिंदेकाँग्रेस
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुखभाजपा
मोहोळयशवंत मानेराष्ट्रवादी (अजित पवार)
अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टीभाजपा
पंढरपूरसमाधान आवताडेभाजपा


सोलापूर मतदारसंघात मराठा आणि लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपानं धार्मिक कार्ड वापरत लिंगायत धर्मगुरु डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर देखील रिंगणात होते. आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार 7 मत मिळवले होते. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतविभागणी याचा फायदा भाजपाला झाला होता. 

यंदा वंचितकडून राहुल गायकवाड रिंगणात आहेत. त्याचबरोबर मुस्लीम मतांचं राजकारण करणाऱ्या AIMIM पक्षानंही आपला उमेदवार दिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी मशिदीतून फतवे निघत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार राम सातपुते यांनी केलाय. त्यामुळे या निवडणुकीत सोलापूरमध्ये धार्मिक ध्रुविकरण होणार का? हा मोठा प्रश्न आहे.

( नक्की वाचा : तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान )

प्रणिती यांनी राम सातपुते यांना पत्र लिहून त्यांना परका उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. त्याला राम सातपुते यांनी उत्तर दिलंय. सोलापूरचे मतदार शिंदे परिवाराला चौथ्यांदा धूळ चारेल, असं आव्हान सातपुते यांनी दिलंय. दोन्ही तरुण आमदारांची ही लढत आगामी काळात आणखी तीव्र होणार असून यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे चार जून रोजी स्पष्ट होईल.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com