'मोदीची गॅरेंटी' हा 2023 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत परवलीचा शब्द ठरला होता. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या उत्तर भारतातील राज्यांनी या शब्दावर विश्वास ठेवून भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं.लोकसभा निवडणुकीपूर्वी मिळालेल्या या मोठ्या यशानं भाजपाचा आत्मविश्वास वाढलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचं ध्येय भाजपानं निश्चित केलंय. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा विश्वास व्यक्त केलाय.
यापूर्वी झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मोदींनी कार्यकर्त्यांना मोठं लक्ष्य देत एकट्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिलं होतं.
कसे गाठणार 370?
लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. ही एकप्रकारे 'मोदी की गॅरंटी मानली जातेय. त्यामुळे या जागा कुठून येणार? याची चर्चा आता सुरु झालीय.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये भाजपानं यापूर्वीच कमाल जागा मिळवल्या आहेत. यंदाही फार तर त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.
दिल्लीत आप आणि काँग्रेस युतीनं भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलंय. पंजाबमध्ये भाजपाला फारशा यशाची अपेक्षा नाही. ओडिशा आणि बंगालमध्येही भाजपासमोर तेथील सत्तारुढ पक्षाचं तगड आव्हान आहे. त्यामुळे इथंही भाजपाला प्रत्येक जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
कोणती राज्य ठरणार निर्णायक?
दक्षिण भारतामधील कर्नाटकात भाजपानं गेल्या निवडणुकीत 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. तर एका जागेवर भाजपा समर्थक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. यंदा कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. इथं काँग्रेसला लोकसभेतही चांगली जागा मिळण्याची शक्यता असून भाजपाच्या जागा कमी होतील असा अंदाज आहे.
केरळमध्ये भाजपाला अद्याप खातं उघडता आलेलं नाही. तर आंध्र प्रदेशमध्ये भाजपानं तेलुगू देसमशी युती केलीय. पण, या युतीत भाजपा हा छोटा भाऊ आहे. या परिस्थितीमध्ये तामिळनाडू आणि तेलंगणा या दोन राज्यांवर भाजपाची मोठी भिस्त आहे.
तामिळनाडूमध्ये अन्नामलाई यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपानं वर्षभरापूर्वीच निवडणुकांची तयारी सुरु केलीय. अन्नामलाई यांच्या यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. जयललिता यांच्या निधानंतर अण्णा द्रमुक पक्षाची पिछेहाट झालीय.
अण्णा द्रमुक कमकुवत झाल्यानं निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचा भाजाचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या वर्षात सातत्यानं तामिळनाडूचा दौरा करत ही स्पेस व्यापण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील छोट्या पक्षांना घेऊन या लोकसभेत चमत्कार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
तामिळनाडू प्रमाणेच तेलंगणामध्येही भाजपाला मोठी आशा आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या निकालात चंद्रशेखर राव यांच्यावरील नाराजी स्पष्टपणे दिसली होती. भारत राष्ट्र समितीवर नाराज असलेल्या मतदारांना आपल्याकडं वळवण्यात भाजपा यशस्वी ठरला तर इथंही भाजपाची स्थिती सुधारु शकते.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 17 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकीत दोन अंकी जागा जिंकण्याचं भाजपाचं ध्येय आहे.