राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातील आजचा दिवस (गुरुवार, 19 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजवला. राज्यपालांच्या अभिषणावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी विरोधकांना जनमताचा आदर करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, शहरी नक्षलवाद, EVM चे नरेटीव्ह, शेतकऱ्यांच्या समस्या यासह वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर उत्तर दिलं.
मुख्यमंत्र्यांनी या भाषणाचा समारोप 'महाराष्ट्र आता थांबणार नाही', या कवितेनं केला. या कवितेमधून फडणवीस यांनी सरकारचं मिशन सभागृहासमोर मांडलं. देवेंद्र फडणीस यापूर्वी 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या अधिवेशनात फडणवीसांनी 'मी पुन्हा येईन', ही कविता सादर केली होती. ती कविता चांगलीच गाजली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी सभागृहात कविता सादर केली आहे.
( नक्की वाचा : 'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा )
देवेंद्र फडणवीसांची संपूर्ण कविता
महाराष्ट्र आता थांबणार नाही
सोबत राहू एक दिलाने
घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने
समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात
बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ
तरुणाईचं स्वप्न आता भंगणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
रस्ते, पूल, रेल्वेचे धागे
सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे
गतीला स्थगिती मिळणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल
मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल
मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
जलयुक्त शिवार देईल नवजीवन
नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन
राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
पाणंद रस्त्यांनी जोडू शेतीशिवार
आनंदाचा शिधा देई आधार
उपाशी पोटी कुणी झोपणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान
ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान
लाडक्या लेखी दु:खी होणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही
असेल विरोधकांचे कमी संख्याबळ
सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ
कोणत्याही आमदाराचा मान-सन्मान घटणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही