राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या अर्थसंकल्पा वेळी अजित पवारांचे गुलाबी जॅकेटपण गायब होते, आणि लाडक्या बहिणी ही गायब होत्या, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. खुर्ची काबीज करण्यासाठी लाडक्या बहिणीं बरोबर गद्दारी करण्यात आली, असं म्हणत त्यांनी या अर्थ संकल्पाची चिरफाड केली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दादा क्या हुवा तेरा वादा असा सवाल विजय वेडट्टीवार यांनी केला आहे. बहिणींबरोबर गद्दारी करून खुर्ची काबीज करणाऱ्याला काय म्हणणार असा हल्लाबोल त्यांनी केला. ज्या महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली. त्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पात करण्यात आलं. बहिणींना या सरकारनं फसवलं. निवडणुकीत 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नव्हता. आता दादांचं गुलाबी जॅकेट ही गायब झालं आहे. सोबतीला लाडक्या बहिणी ही बजेटमधून गायब झाल्याच्या दिसल्या असंही वडेट्टीवार म्हणाले.
निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं घेतली. तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करु असं अश्वासन दिलं होतं. मात्र अशी कुठलीही माफी दिली गेली नाही. सरकारने शेतकऱ्यां बरोबर बेमानी केली आहे. हे गद्दारांचे सरकार आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. टक्केवारी खाण्यासाठी, तिजोरी लुटण्यासाठी, भांडवलदारांच्या फायद्यासाठी हे बजेट होते असंही वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण महाराष्ट्र या बजेटमध्ये दिसला नाही, असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केला.
तिजोरीत खडखडाट, शब्दाचे बुडबुडे येवढेच या अर्थ संकल्पात दिसले. घोषणांचा सुकाळ आणि निधींचा दुष्काळ असंच या अर्थ संकल्पाबाबत बोलावं लागेल असं ते म्हणाले. सव्वा लाख कोटींची राजकोषीय तूट, 45 हजार कोटींची वित्तीय तुट आहे. त्यामुळे हे सरकार भीक मागायचं सरकार झालं आहे. सर्व सामान्य जनता, तरुण, आदिवासी, महिला, अल्पसंख्याक यांच्या पदरी निराशा आली आहे. टक्केवारी कमावण्यासाठी मांडलेलं हे बजेट आहे असंही त्यांनी सांगितलं.
वीज दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बाबत चकार शब्दही या बजेटमध्ये काढण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे. मात्र त्या स्मारकाचा विसर सरकारला पडला आहे. भाषणात केवळ घोषणा पाऊस पाडला आहे. पण नीधीचा मात्र पत्ता नाही. हे करु, हे करणार, हे ठरवलं आहे, निर्णय घेतला आहे या पलिकडे काही नव्हते. हे बजेट रायगड आणि पुण्याचं होतंय. थोडंबहोत मुंबई आणि उरलेलं नागपूर बाकीच्यांना भोपळा असं म्हणावं लागेल असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.