Maharashtra Cabinet Reshuffle: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सध्याचा काळ संघर्षाचा ठरताना दिसत आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांची विकेट पडली असून आता रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कोकाटे बाहेर पडताच पक्षातल्या इतर इच्छुकांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली असून अनेक दिग्गज नेते आता रेसमध्ये धावू लागले आहेत.
कोण घेणार कोकाटेंची जागा?
माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला होता. विशेष म्हणजे याच काळात धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कोकाटे अडचणीत येणे आणि त्याच वेळी मुंडे यांनी दिल्लीत गाठीभेटी घेणे हा केवळ योगायोग असावा की त्यामागे काही राजकीय रणनीती आहे, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत.
कोकाटे यांचा पत्ता कट झाल्याने आता धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रकाश सोळंके आणि संग्राम जगताप यांच्या नावांची चर्चा मंत्रालयापासून ते दिल्लीपर्यंत रंगली आहे.
( नक्की वाचा : Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा, पण आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टानं काय सांगितलं? )
मराठा कार्ड की ओबीसी चेहरा?
कोकाटे हे अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचा मराठा चेहरा होते. सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. अशा परिस्थितीत कोकाटेंच्या जागी पुन्हा एकदा मराठा नेत्यालाच संधी द्यावी, असा सूर पक्षात उमटत आहे. यासाठी माजी मंत्री अनिल पाटील यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्याचे राजकीय समीकरण साधण्यासाठी आणि मराठा चेहरा म्हणून प्रकाश सोळंके यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार सुरू आहे.
जातीय समीकरणांची जुळवाजुळव
दुसरीकडे छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या म्हणावी तशी साथ देत नाहीये. त्यामुळे मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा असावा, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा कल धनंजय मुंडे यांच्या बाजूने असल्याचे समजते. मात्र, जर मराठा आणि ओबीसी या दोन्ही पर्यायांचा विचार बाजूला ठेवून मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे ठरले, तर लातूरचे संजय बनसोडे यांचे नाव चर्चेत येऊ शकते. त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले संग्राम जगताप यांना संधी देऊन पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्नही अजित पवार करू शकतात.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : कोकाटेंना दणका, मुंडेंना संधी? राष्ट्रवादीत खळबळ; शाह-मुंडे भेटीने राजकीय समीकरणे बदलणार! )
तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका
एकीकडे नावांची चर्चा सुरू असली तरी पक्ष नेतृत्व सध्या घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा मोक्याच्या वेळी कोकाटेंचा राजीनामा होणे ही पक्षासाठी एक प्रकारे नाचक्की ठरली आहे. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या आम्हाला मंत्रिपदाची कोणतीही घाई नाही, तर आगामी निवडणुका जिंकणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोणालाही मंत्रिपद देऊन इतरांना नाराज करायचे नाही, अशी सावध भूमिका सध्या राष्ट्रवादीने घेतल्याचे दिसत आहे.