Maharashtra Election : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल.
5 वर्षात बदलली परिस्थिती
राज्यात यापूर्वी 2019 साली विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षात फुट पडली आहे. दोन्ही गट आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं शिवसेनेतील एका पक्षाचं नेतृत्त्व आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे यांना नवं निवडणूक चिन्ह आणि नाव मिळालंय. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडलीय. अजित पवार यांच्याकडं पक्षाचं जुनं निवडणूक चिन्ह आहे. तर या पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या पक्षाला नवं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळालंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2024 मध्ये काय होणार?
विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात याच वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला. विशेषत: भाजपाच्या जागा चांगल्याच घटल्या. पण, मतांच्या टक्केवारीत एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये फार फरक नव्हता. एनडीएला 43.6 टक्के तर इंडिया आघाडीला 43.9 टक्के मतं मिळाली. मतांचं अंतर 0.3 टक्के इतकं होतं. पण, दोन्ही आघाड्यांच्या जागांमध्ये बराच फरक आहे. एनडीएला 17 तर इंडिया आघाडीला 30 जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
महायुती आणि मविआची परिस्थिती काय?
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये उत्साहचं वातावरण होतं. विधानसभा निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांच्या नेत्यांना आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे विधानसभा मतदारसंघाच्या आधारावर विश्लेषण केलं तर राज्यातील 288 पैकी 153 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. तर महायुतीला 126 जागा मिळतील.
( नक्की वाचा : महाराष्ट्र आणि झारखंड कसं जिंकणार? वाचा भाजपा-काँग्रेसचा पूर्ण प्लॅन )
लोकसभा निवडणुकांच्या आधारावर भाजपाला 79, शिवसेना 40, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) -6 तर आरएसपीला 1 जागा मिळेल. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसला 63, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 57, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 33 जागा मिळू शकतात. 9 जागांवर अन्य उमेदवार विजयी होतील. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी 145 ही मॅजिक फिगर आहे.
विधानसभा निवडणूक 2019 मधील पक्षीय बलाबल
भाजपा - 105
शिवसेना - 65
राष्ट्रवादी काँग्रेस - 54
काँग्रेस - 44
मनसे - 1
................................
2019 मधील मतदानाची टक्केवारी
भाजपा - 25.8 %
शिवसेना - 16.4 %
राष्ट्रवादी काँग्रेस - 16.7 %
काँग्रेस - 15.9 %
मनसे - 2.3 %