Maharashtra Assembly Session 2025: हिंदी भाषा पहिली पासून सक्तीची करण्याच्या निर्णया विरोधात राज्यात रान पेटले होते. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जेरीस आणलं होतं. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. हे चित्र पावसाळी अधिवेशन सुरू होण्या पूर्वी होतं. आता पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. पण अनेक आमदार आजही विधानसभेत मराठी ऐवजी हिंदीतून बोलताना दिसतात. त्यावर कहर म्हणजे सत्ताधारी मंत्री ही त्याला हिंदीतून उत्तर देताना दिसत आहे. असाच एक प्रसंग विधानसभेत पाहायला मिळाला. त्यामुळे बाहेर मराठीचा डंका आणि विधानसभेत मात्र हिंदीचा तडखा अशी चर्चा विधान भवनात रंगली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेत आज ही काही आमदार असे आहेत जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राहुन मराठीत बोलत नाहीत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. मंगळवार हा अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. नियमानुसार विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, इंग्रजीमध्ये आमदार बोलू शकतात. मात्र महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिल्यानंतरही अनेक आमदारांना आजही मराठी बोलता येत नाही. ते हिंदीतूनच बोलताना दिसतात. आजही तसेच झाले. प्रदुषणाच्या मुद्द्यावर विधानसभेत थेट हिंदीतून प्रश्न विचारला गेला. त्याला मंत्री महोदयांनी उत्तर हिंदीतूनच दिलं.
प्रदूषणाच्या मुद्दावरून विधनसभेत आमदार अबू आझमी यांनी त्यांच्या मतदार संघातील एक प्रश्न विचारला. हा प्रश्न त्यांनी हिंदीतून विचारला. मानखुर्द -शिवाजीनगरमधील कुर्ला स्क्रॅपमध्ये अवैध केमिकल बनवण्याचे, साबण बनवण्याचे काम सुरू आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आजार वाढत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली जाईल असा प्रश्न त्यांनी विचारला होता. हा प्रश्न त्यांनी हिंदीतून विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या उभ्या राहील्या.
त्या मराठीतून उत्तर देतील असं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. त्यांनी ही आझमी यांच्या प्रश्नाला हिंदीतून उत्तर द्यायला सुरूवात केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील काही आमदारांनी त्यांना मराठीतून बोला असे सांगितले. पंकजा यांनीही परिस्थिती सावरून घेत, मराठीतून बोलण्यास सुरूवात केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंकजा मुंडे या उत्तर देत असताना, प्रश्न विचारणाऱ्या अबू आझमींना फटकारले. 'इतकी वर्ष महाराष्ट्रात राहताय, आता तरी मराठीत बोलायला सुरुवात करा' असं म्हणत सरनाईक यांनी आझमींना सुनावले.
अजित पवारांच्या पक्षाच्या आमदार सना मलिक या हिंदीतून बोलतात. त्यांचे वडील नवाब मलिक हे महाराष्ट्राचे मंत्री होते. ते जितकं शक्य होईल तितके मराठीमधून संवाद साधायचे. वडिलांप्रमाणे त्यांच्या लेकीने मराठीत बोलावे असा प्रयत्न केल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे ज्या आमदारांना मराठी येत नाही त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह अधिवेशनाच्या पुढील दिवसात होताना दिसेल का? किंवा ते आमदार स्वत: मराठीत बोलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.