Manoj Jarange Patil Live News : लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मात्र कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणी वागू नये, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मराठ्यांना सगेसोयऱ्यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी 'चलो मुंबई' चा नारा दिला आहे. मनोज जरांगे त्यांच्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं येत आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मराठा आरक्षणासंदर्भात आमच्याच सरकारनं निर्णय घेतले. आम्हीच आरक्षण दिल आणि ते कोर्टातही टिकलं, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी करुन दिली.
ओबीसीमधून आरक्षण मागणाऱ्यांची मागणी मला कळत नाही. ओबीसी मध्येच 350 जाती आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी आम्ही निर्णय घेतलाय. पण राजकीय आरक्षणासाठी लढाई सुरु आहे का हे स्पष्ट करावं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ अनेक वर्षे अस्तित्वात नव्ह्तं येत, तो निर्णय आम्ही घेऊन कोट्यवधींची मदत दिली. सारथी मधून अनेक अधिकारी बनवले. मागच्या अनेक वर्षांत मराठा समाजासाठी बाकीच्या नेत्यांनी एक सिंगल निर्णय घेतलेला मला दाखवून द्या, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत? )
7 टप्प्यात होणार आंदोलन
दरम्यान, मुंबईत होणारं मनोज जरांगे यांचं आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NDTV मराठीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन 7 टप्प्यांत विभागले आहे.
NDTV मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन फक्त मुंबईतच होणार नाही, तर गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत त्याचे आयोजन केले जाईल. याचाच अर्थ, जिथे मराठा समाज राहतो, तिथे हे आंदोलन सुरू होईल. उद्या (29 ऑगस्ट) पासून फक्त मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. या 7 टप्प्यांच्या आंदोलनात कोणते टप्पे असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.