विशाल पाटील, प्रतिनिधी
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 'सगेसोयरे' यासह सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज (30 ऑगस्ट) उपोषणाचा दुसरा दिवस असून, राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक या ठिकाणी जमले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
आज (शनिवार, 30 ऑगस्ट ) राज्य सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे यांचा समावेश होता. या बैठकीत दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्याने चर्चा अधिकच तापली.
चर्चेमध्ये नेमकं काय झालं?
आंदोलकांवरील गुन्हे मागे: सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर सर्व खटले मागे घेतले जातील, असे सरकारने स्पष्ट केले.
हुतात्मा आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी: आरक्षणासाठी ज्या 53 आंदोलकांनी आपला जीव गमावला, त्यापैकी पात्र ठरलेल्या 23 जणांना राज्य परिवहन मंडळात नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.
( नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंबधीचे सर्व अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा )
हैदराबाद गॅझेट आणि कुणबी नोंदी: हैदराबाद गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींवर चर्चा झाली. मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. सरकारने आतापर्यंत झालेल्या कुणबी नोंदींची माहिती दिली.
या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारला अनेक प्रतिप्रश्न विचारले. त्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ कोणताही तोडगा न काढता परतले. मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असून, तात्काळ निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाकडे आणि पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.