'सत्तेत आला म्हणून गुर्मीत राहू नका, एका दणक्यात गुर्मी उतरवू' जरांगेंचा इशारा कोणाला?

मुख्यमंत्री कोणी झाला तरी फरक पडत नाही. आमचा संघर्ष सुरूच राहाणार आहे. या आधीही हा संघर्ष सुरू होता, असं जरांगे पाटील म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
जालना:

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नवं सरकार लवकरच स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर दिसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत हा प्रभाव ओसरलेला दिसला. महायुती पुन्हा सत्तेत आली. नुसती सत्ते आली नाही तर बंपर जागा घेवून निवडून आली. जरांगे यांनी पाडा असा आदेश दिला होता. नंतर त्यांनी कोणाला पाडायचं ते ठरवा असंही सांगितलं. त्यामुळे त्यांचा प्रभाव या निवडणुकीत काही दिसला नाही. आता जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यांनी सामुहीक उपोषणाची घोषणाही केली आहे. त्याच बरोबर त्यांनी नव्या सरकारला या निमित्ताने इशाराही दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सत्तेत कोण येतो याचा मराठ्यांना फरक पडत नाही. या आधीही मराठ्यांनी संघर्ष केला आहे यापुढेही हा संघर्ष सुरू राहील असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठ्यांचा इफेक्ट लोकसभेला पाहीला आणि आता विधानसभेलाही दिसला असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे माजोऱ्यासारखे बेईमानी करू नका असा टोला त्यांनी लगावला आहे. प्रामाणिकपणे एखादा समाज जर वागत असेल तर त्याला डिवचण्याचे काम करू नका असं ही ते म्हणाले आहेत. जर तुम्ही तसे केले तर तुमचेय जुने दिवस तुमच्या नशिबी येतील. इफेक्ट होणार नाही असं म्हणणार असाल तर मराठा तुम्हाला रसातळाला नेईल असा इशाराही जरांगे यांनी नव्या सरकारला दिला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Inside Story: शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा का सोडला? दिल्लीत पडद्या मागे काय घडलं?

मराठ्यां शिवाय कोणाची ही सत्ता येणार नाही. त्यामुळे माजमस्ती सोडा. एक गठ्ठा जर का विरोधात गेलो तर पहिला पाडा मोजावा लागेल असं ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी छगन भुजबळांनाही सुनावलं. मराठ्यांच्या मनात पाप असतं तर निवडून आला नसता. सगळ्या मतदारांना सांगितलं होतं, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आम्ही हस्तक्षेप केला नाही. मराठा स्वताच्या मताचा मालक स्वता होता. त्यांनी त्याचं ठरवलं. त्यामुळे होवून गेल्यावर काही बोलण्यात अर्थ नाही. भुजबळही मराठा मतांमुळेच जिंकले. त्या शिवाय का त्यांना आमदार होता आलं असा प्रश्नही त्यांनी केला. जर ठरवून केलं असतं तर भुजबळांची धुळदाण उडाली असती असंही जरांगे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?

दरम्यान मुख्यमंत्री कोणी झाला तरी फरक पडत नाही. आमचा संघर्ष सुरूच राहाणार आहे. या आधीही हा संघर्ष सुरू होता. याच सरकार विरुद्ध सुरू होता असं जरांगे म्हणाले. हा आला काय आणि तो आला काय मराठ्यांना त्याच्याशी देणेघेणे नाही. मात्र मराठ्यां बरोबर बेईमानी करू नका. मराठ्यांच्या नादाला लागू नका. सत्ता मिळाली. जास्ता जागा निवडून आल्या म्हणून गुर्मीत राहू नका. नाही तर मराठे एका दणक्यात गुर्मी उतरवतील. आम्ही लढ्यासाठी सज्ज आहोत. 4 तारखेला अंतरवालीत आरक्षणासाठी सामुहीक उपोषण करणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. त्यामुळे नवे सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष लगेचच सुरू होणार आहे.  

Advertisement