मनोज सातवी
मिरा भाईंदर शहरात एका हनुमान मंदिरावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खाजगी जागेत असलेल्या श्याम भवन या धोकादायक इमारतीच्या पुनर्निर्माणासाठी इमारत तोडण्यात आली. त्यावेळी मंदिर देखील तोडण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरल्या. मंदिराच्या संरक्षणासाठी मंत्री प्रताप सरनाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. शिवसेना मनसेने तर मंदिर संरक्षणार्थ महा आरतीचे आयोजन देखील केले आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे जागा मालक यांनी हा वाद निरर्थक असल्याचे म्हणत आम्ही इमारत आणि मंदिराचे योग्य पुनर्वसन करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मंदिराचा वाद पेटवून जो तो आपल्या राजकीय पोळ्या बाजूला लागला आहे का ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
भाईंदर पूर्वेला बीपी रोडवरील श्याम भवन या इमारतीचे रीडेव्हलपमेंटचे काम होणार आहे. या बिल्डिंगला लागून असलेल्या खाजगी जागेत हनुमान मंदिर आहे. इमारत धोकादायक असल्याने तोडण्यात आली असल्याची माहिती मेहता यांनी दिली. मंदिर तोडून मेहता यांचे परिचित जमीनमालक मंदिर नवीन बांधणार आहेत. मात्र आमदार नरेंद्र मेहता हे या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यासाठी जर मंदिर तोडत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही अशी भीम प्रतिज्ञाच मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या संरक्षणासाठी त्यांनी महाआरती देखील घेतली आणि या वादाची ठिणगी पेटली.
तर हा वादच मुळात निरर्थक आहे, असं म्हणत ज्याची जागा आहे तो तोडायच की ठेवायचं ते ठरवेल. त्यात उगाच राजकारण करायला नको असं स्थानिक आमदारांनी सांगितलं आहे. प्रताप सरनाईक यांची पापं जास्त झाली म्हणून त्यांनी महा आरती घेतली. मंदिरावरून प्रताप सरनाईक राजकारण करत असून, किमान देवाला तरी सोडा" असा टोला आमदार नरेंद्र मेहता यांनी लागवला आहे. निवडणुका आल्या की सरनाईक घाण राजकारण करतात. मला हिंदू विरोधी किंवा मुस्लिम बनवतात. असे म्हणत नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना लक्ष केलं आहे.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
श्याम भवन ही इमारत आणि मंदिराच्या जागेचे मालक मधू शर्मा यांनी देखील या सर्व अफवा असल्याचे सांगितले. त्यांच्या आईने इतर रहिवाशांच्या मदतीने हे मंदिर बांधले असल्याचे सांगितले आहे. शिवाय या ठिकाणी नवीन इमारती सोबत मंदिर देखील नवीन बांधणार आहे. त्याचा आम्ही सोसायटी मिळून निर्णय घेणार असल्याचे सांगून नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र मंदिरावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वाद पेटला आहे. त्यात आता या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली देखील मंदिराच्या रक्षणासाठी रात्री मंदिरात महा आरती पार पडली. त्यामुळे आता हनुमान मंदिराचा वाद पेटवून जो तो आपल्या राजकीय पोळ्या भाजायला लागला आहे का ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.