Raj Thackeray Speech: मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी संघर्षाचं केंद्र ठरलेल्या मीरा रोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी (18 जुलै) सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हिंदी भाषेची सक्ती ही पहिली पायरी आहे. त्यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप राज यांनी या सभेत केला.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं की, 'तुम्ही हे षडयंत्र नीट समजून घेतलं पाहिजे. मुंबईला हात लावायचा असेल तर या ठिकाणचे मीरा भाईंदर पासून ते पालघरपर्यंतचे सर्व मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. मी गेले 20 वर्षे ओरडून, बोंबलून बोंबलून सांगतोय. ही नुसती माणसं येत नाहीयत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येतात. नुसती माणसं येत नाहीयत तर ते मतदारसंघ बनवत आहेत", असा दावा राज यांनी केला.
( नक्की वाचा: Raj Thackeray: '.... तर राज्यातील शाळाही बंद करेन', राज ठाकरेंचा इशारा, पाहा संपूर्ण भाषण, Video )
हे मतदारसंघ बनवून तुम्हाला लांब फेकून देणार आणि नंतर सांगणार आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचाच महापौर असं करुन हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा आख्खाचा आख्खा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरु आहेत.
हे आज पूर्वीपासून सुरु आहे. त्यांनी पूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं. पण आज लपूनछपून सर्व गोष्टी सुरु आहेत. हे काय षडयंत्र आहे ते आपण नीट ओळखा. समजून घ्या. हा सहज आलेला माज नाही. हे तुमच्या अंगावर येतात आणि बोलतात मराठी नाही बोलणार, हा माज तिथून आलेला आहे", असं राज यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा: Raj Thackeray : 'दुबे मुंबई मे आना, डुबे, डुबे के मारेंगे', राज ठाकरेंचं भाजपा खासदाराला आव्हान पाहा Video )
माझं कुणाशीही मैत्री किंवा शत्रूत्व असो, महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे कधीही तडजोड करणार नाही. तुम्ही नेहमी मराठीमध्येच बोला, समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.