
महेंद्र वानखेडे
राज्यात हिंदी सक्तीवरून वातावरण तापले आहे. त्यात मिरारोडमध्ये मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकास चांगला चोप दिला आहे. मिरारोडच्या बालाजी हॉटेल जवळ ही घटना घडली आहे. मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकान चालकाच्या कानशिलात लगावली आहे. त्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने त्याला हा प्रसाद देण्यात आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती बाबत दोन जीआर रद्द केले. त्याची घोषणा रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पत्रकार परिषदेत केली. या निर्णयाने संपूर्ण राज्यभरात मराठी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयानंतर राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मिरा भाईंदरमधील मनसैनिकांनी मिरारोड मधील बालाजी हॉटेल जवळ जल्लोष साजरा करत होते.
त्याच वेळी पाणी पिण्यासाठी जोधपूर स्वीट या दुकानात मनसैनिक गेले होते. या दरम्यान दुकान मालक हिंदी भाषेत बोलत होता. त्यावेळी त्याला तुम्ही मराठी शिका आणि बोला असे मनसैनिकानी सांगितले. पण दुकान मालकाने मराठी बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. यावेळी आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता, त्या भाषेचा आदर का करत नाही असे अनेक प्रश्न मनसैनिकांनी त्या मालकाला विचारले.
पण त्याचे काही एक उत्तर त्या दुकान मालकाकडे नव्हते. त्यामुळे मनसैनिक चांगलेच संतापले. त्यांनी त्या दुकान मालकाला चांगलाच चोप दिला. एका बाजूला संपूर्ण राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष सुरू तर दुसरीकडे मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला प्रसाद मनसे कडून देण्यात आला. यानंतर शहरातील परप्रांतीयांना मनसैनिकांकडून विनंती करण्यात आली. आपण ज्या राज्यात राहत आहात, तिथल्या संस्कृतीचा,भाषेचा आदर करावा. अन्यथा मनसे खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world