जाहिरात

Modi cabinet: मोदी सरकारमध्ये लवकरच मोठे फेरबदल? 'या' कारणांमुळे अनेक बड्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

Modi cabinet reshuffle: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलांची चर्चा सुरु झाली आहे.

Modi cabinet: मोदी सरकारमध्ये लवकरच मोठे फेरबदल? 'या' कारणांमुळे अनेक बड्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात!
Modi cabinet reshuffle: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2 वर्षे पूर्ण करत आहेत.
मुंबई:

Modi cabinet reshuffle: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलांची चर्चा सुरु झाली आहे. दोन केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याच्या भाजपच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2 वर्षे पूर्ण करत आहेत. मोदींच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळातील मंत्रिमंडळ विस्ताराचा पॅटर्न पाहिला तर येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिपरिषद बदलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. आगामी काळातील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा फेरबदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधण्यासोबतच मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारे हा बदल केला जाणार असल्याचे समजते. या मेगा फेरबदलामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची तर काही दिग्गजांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यांना प्राधान्य?

येत्या काळात देशातील 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबचा अपवाद वळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. निवडणुका असलेल्या या सर्व राज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.

पंजाबमधून येणारे केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे पंजाबमधून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे पंजाबमधीलच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

( नक्की वाचा : Mamata Banerjee: बंगालमध्ये 'शिंदे स्टाईल' बंड! TMC हे नाव आणि चिन्ह बंडखोर गटाला मिळणार? पाहा काय आहेत नियम )

उत्तर प्रदेशातील मंत्र्यांचे काय होणार

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री बी एल वर्मा हे देखील उत्तर प्रदेशातूनच राज्यसभेवर असून त्यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबर पर्यंतच आहे.

उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या 11 जागांसाठी या वर्षाच्या शेवटी निवडणूक होणार आहे, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला तिथे विधानसभा निवडणूक आहे. त्याच सुमारास उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्येही निवडणुका होतील. तर पुढील वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशात मतदान होईल. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात लॉटरी लागू शकते.

( नक्की वाचा : Sanjay Raut: मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता काय घडणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने नाशिकचे राजकारण तापले )

कसे ठरणार मंत्र्यांचे भविष्य?

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट सचिवांनी सर्व मंत्रालयांचे प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड सादर केले होते. यामध्ये लोकांच्या तक्रारींचे निवारण आणि सुधारणांच्या बाबतीत 5 सर्वोत्तम मंत्रालयांची नावे सांगण्यात आली होती. याशिवाय फाईल्स निकाली काढण्यासाठी लागणारा वेळ आणि न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे या निकषांवर सर्व मंत्रालयांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. या मूल्यमापनाचा फेरबदलात मोठा वाटा असणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून सुटी दिली जाऊ शकते, तर काहींना पक्ष संघटनेच्या कामासाठी पाठवले जाऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये भाजपने महत्त्वपूर्ण कामगिरी केली असल्याने तेथील प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. बिहारमधील काही विद्यमान मंत्र्यांना हटवून नवीन चेहरे आणले जाऊ शकतात. मात्र, मित्रपक्षांचा कोटा सध्या आहे तेवढाच राहण्याची शक्यता असून त्यांच्याकडून नवीन मंत्री केले जाण्याची शक्यता कमी आहे.

मंत्रिमंडळातील संख्याबळ आणि मोदींचा जुना पॅटर्न

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात 72 सदस्य आहेत, तर ही कमाल संख्या 81 पर्यंत असू शकते. म्हणजेच अजूनही 9 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यास वाव आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारला 26 मे रोजी 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर तिसऱ्या टर्मची 2 वर्षे 9 जूनला पूर्ण होत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आधीच्या कार्यकाळाचा इतिहास पाहिला तर, पहिल्या टर्ममध्ये सरकार स्थापनेनंतर 6 महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर 2014 मध्ये पहिला विस्तार झाला होता. त्यानंतर जुलै 2016 आणि सप्टेंबर 2017 मध्ये बदल झाले होते. दुसऱ्या टर्ममध्ये सरकार स्थापनेनंतर सुमारे 2 वर्षांनी म्हणजेच जुलै 2021 मध्ये मोठा फेरबदल झाला होता, तर मे 2023 मध्ये खात्यांची अदलाबदल झाली होती. आता तिसऱ्या टर्मची 2 वर्षे पूर्ण होत असताना राजकीय समीकरणांचा विचार करून हा मोठा फेरबदल केला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com