रामराजे शिंदे, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आणि फेरबदल येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपला राज्यसभा कार्यकाळ संपल्यामुळे दिलेला राजीनामा आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठकांमुळे या चर्चांना कमालीचा वेग आला आहे. या आगामी विस्तारात महाराष्ट्राला मोठे प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असून अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळू शकतात.
महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?
आगामी विस्तारात महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल साधण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तर ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदी वर्णी लागू शकतो. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातून पार्थ पवार यांना दिल्लीच्या राजकारणात मुख्य प्रवाहात आणून मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा- Mumbai Rain: मुंबईतून पाऊस गायब! नागरिकांचं टेन्शन वाढलं; पुन्हा कधी बरसणार? हवामान विभागाने दिली माहिती)
कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
- प्रतापराव जाधव (शिवसेना)
- मुरलीधर मोहोळ (भाजप)
- रक्षा खडसे (भाजप)
राष्ट्रीय स्तरावरही होणार मोठे फेरबदल
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही मोदी सरकार 'मिड-टर्म रिसेट' करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहेत. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांना मंत्रिमंडळात थेट आणून देशाच्या आर्थिक धोरणांची धुरा किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
बिहारचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार हे स्वतः केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊ शकतात. 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे मेरठचे खासदार अरुण गोविल यांना संधी दिली जाऊ शकते. कथित राम मंदिर निधी विषयांनंतर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून त्यांना पुढे केले जाण्याची चर्चा आहे.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: केतनला ढकलल्यानंतर सियाचे पहिले शब्द काय होते? गडावरील सुरक्षारक्षकाने सांगितलं...)
धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी आउट?
धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी या दोन बड्या आणि ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज चौधरी यांना मंत्रिपदावरून हटवून पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातून (AAP) आलेल्या राघव चड्ढा किंवा अशोक मित्तल यांच्यापैकी एकाला मंत्रिपद दिले जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world