Mumbai Metro 3 : महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक स्टेशनचे नाव... भाजपाच्या 'कॉर्पोरेट हिंदुत्वावर' काँग्रेसचा आरोप

Mumbai Metro 3 Naming Row: मुंबई मेट्रो ३ (अ‍ॅक्वा लाईन) मार्गावरील काही स्थानकांना खासगी कंपन्यांची नावे देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Metro 3 Naming Row: महापुरुष व देवस्थानांच्या नावाचा व्यापारासाठी वापर होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे.
मुंबई:

Mumbai Metro 3 Naming Row: मुंबई मेट्रो ३ (अ‍ॅक्वा लाईन) मार्गावरील काही स्थानकांना खासगी कंपन्यांची नावे देण्याच्या आणि 'नेहरू सायन्स सेंटर' या नावामध्ये बदल करण्याच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपचे 'कॉर्पोरेट हिंदुत्व' आणि महापुरुष व देवस्थानांच्या नावाचा व्यापारासाठी वापर होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

खासगी नामकरणाला विरोध

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. मेट्रो 3 च्या अनेक स्थानकांना खासगी कंपन्यांची नावे देण्यात आली आहेत. 'सिद्धिविनायक स्थानक' हे 'लोम्बार्ड सिद्धिविनायक स्थानक', तर 'एचडीएफसी लाइफ महालक्ष्मी स्थानक' आणि 'कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' अशाप्रकारे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणावर आक्षेप घेताना सावंत म्हणाले, "महापुरुष आणि देवस्थानांची ही नावे आपला वारसा आहेत, आपल्या संस्कृतीचा परिचय आहेत. त्यांचा फक्त आणि फक्त व्यापारासाठी वापर केला जात आहे. आम्ही हे चालू देणार नाही, आमचा याला ठाम विरोध आहे." भाजप-महायुतीने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

( नक्की वाचा : Mumbai Metro3: फक्त 1 'Hi' आणि तिकीट हातात! मुंबई मेट्रोचं WhatsApp वर मिळणार तिकीट, वाचा संपूर्ण पद्धत )
 

नेहरूंचे नाव जाणीवपूर्वक वगळले!

'नेहरू सायन्स सेंटर' या मेट्रो स्थानकाचे नाव बदलून केवळ 'सायन्स सेंटर' असे जाणीवपूर्वक केले गेले असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. "या देशासाठी आपले आयुष्य दिले, अशा नेत्यांचे नाव बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. अनेक ठिकाणाहून नेहरूंचे नाव हटवण्यात आले आहे," असे सावंत म्हणाले. नामकरण करणे हा मूलभूत प्रश्नांकडून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी धर्माचे राजकारण करण्याचा एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले.

'कॉर्पोरेट हिंदुत्वा'ची टीका

 "भाजपचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे आहे," असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर कठोर टीका केली. मेट्रोच्या स्थानकांना खासगी कंपन्यांची नावे देऊन 'कंत्राटदारांशी लागेबांधे' ठेवले जात आहेत. त्यामुळे हे हिंदुत्व नसून 'कॉर्पोरेट हिंदुत्व' असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आगामी दिवाळीची सुरुवात 'महायुतीच्या मागे फटाके वाजवून' करणार असल्याचेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
 

Topics mentioned in this article