पहिल्याच पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष करुन मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार हल्लाबोल केला. आमच्या नेत्यांवर बोलणं बंद करा नाही तर तुमचं दुकान बंद केल्या शिवाय राहाणार नाही असा इशाराच राणे यांनी दिला. शिवाय ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही असं ही ते यावेळी म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिनो मोरयाच्या कंपनीत आदित्य ठाकरे भागिदार आहे. भ्रष्टाचाराचा सगळा पैसा तिकडेच जातो असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. एकनाथ शिंदेंवर टीका केली गेली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण एकनाथ शिंदे शांत आहेत. त्यांनी मातोश्रीवर पोहोचवलेली पोती बाहेर काढावीत असं आवाहनही त्यांनी शिंदेंना केलं. उद्धव ठाकरे हे परदेशात गुंतवणूक करतात. त्यांच्या गुंतवणुकीची माहिती माझ्याकडे येणार आहे. ही गुंतवणूक त्यांनी लंडनमध्ये केली आहे असं ही ते म्हणाले.
हे गुंतवलेले पैसे कुठून आले.त्यांना कुठल्या कंपनीचा नफा मिळाला. तो त्यांनी लंडनला पाठवला असा प्रश्न ही राणे यांनी या निमित्ताने केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी- शहा आणि भाजप बद्दल एकही शब्द उच्चारू नये. आता फक्त वीस आमदार आहेत. ते कधी पाच होतील ते समजणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणूका लवकरच आहेत. त्यात यांची सर्व भांडी आपण फोडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सर्व बाहेर काढणार. त्यामुळे ठाकरेंनी तोंड बंद करावं. आमच्या नेत्याबद्दल बोलू नये. नाहीतर तुमचं दुकान बंद केल्या शिवाय राहाणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत पाणी साचलं. पण मुंबईची भौगोलिक रचना उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी समजवून घेतली पाहीजे. गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मग त्यांनी पाणी साचू नये यासाठी काय केले असा प्रश्न ही राणे यांनी केला. दिनो मोरयाच्या घरी आदित्य ठाकरेंच्या बैठका होतात. त्यासाठी कोण कोण येतं. किती मुली येतात याची सर्व माहित आपल्याकडे आहे असंही राणे म्हणाले. उद्धव ठाकरे संपत चालले आहेत. पहिली शिवसेना राहीली नाही. जर आमच्या सारखे शिवसैनिक नसते तर उद्धव आदित्यचे कुठे असते काय माहित असं ही राणे यावेळी म्हणाले.