नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटलेला नाही. शिंदे गटातील शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी रविवारी या वादाला थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची भाषा केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने यावर जोरदार टीका केली आहे. रविवारी अहिल्यानगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रिपदावर काही चर्चा झाली का, असा प्रश्न दादा भुसे यांना विचारण्यात आला. यावर भुसे म्हणाले, नाही. आता हा नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत घेऊन जावा लागेल असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भुसे यांच्या या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला दारात उभे करतात का, ते आधी बघा. डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशासोबत आणि पंतप्रधान मोदींसोबत ज्या पद्धतीने वागत आहेत, आपल्या देशावरील कर (Tariffs) ज्या पद्धतीने वाढवले आहेत, ते पाहता ट्रम्प तुम्हाला जवळ येऊ देतील का, हे बघा असो टोला पेडणेकर यांनी लगावला आहे. सरकार स्थापनेपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटलेला नाही. त्यावर महायुतील्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नेत्यांची नाराजी स्पष्ट पणे दिसत आहे.
महायुती सरकार स्थापन होऊन जवळपास एक वर्ष झाले. तरी नाशिक आणि रायगडला पालकमंत्री मिळालेला नाही. नाशिकमध्ये दादा भुसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ते दोघांनीही या पदावर दावा केला आहे. तर रायगडमध्ये शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, भुसे यांना नाशिकचे पालकमंत्री बनून 2027-2028 मधील कुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर नियंत्रण मिळवायचे आहे. पण नुकतेच सरकारने कुंभमेळा समितीचे प्रमुख म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केल्याने भुसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
एकीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना आणि भाजपने दावा केला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भर पडली आहे. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आता मंत्री आहेत. त्यांनी ही आपण नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये रायगड पेक्षा जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. असं असताना नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी पक्ष आग्रही का नाही असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळेच वैतागलेल्या भूसे यांनी थेट हा प्रश्न ट्रम्प यांच्या कोर्टात नेण्याचे भाष्य करत एक प्रकार महायुतीला घरचा आहेर दिला आहे.