अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा अद्याप सुटलेला नाही. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. नवनीत राणा यांनी मेळघाटात प्रचाराला सुरुवात केली होती. ट्रकवर मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यावर 'मेळघाट की बेटी' असा उल्लेखही करण्यात आला होता. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांच्या सह देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्यांचे फोटो बॅनरवर छापण्यात आले होते. मात्र या रथाला प्रचारात उतरण्याची संधी मिळत नसल्याचं दिसत आहे.
भाजपकडून अद्याप नवनीत राणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तरी देखील त्यांनी प्रचार सुरू केल्याने भाजपकडून राणांना प्रचाररथ थांबवण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. दरम्यान नवनीत राणा गेल्या दोन दिवसापासून घरीच असून त्या देखील मतदार संघात गेल्या नाहीत, अशी माहिती आहे. भाजपच्या अधिकृत पक्ष प्रवेशावर नवनीत राणा यांनी अमरावतीत नूकतेच सूचक वक्तव्य केले आहे. 'लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये,' असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी एनडीएच्या घटक पक्षांना दम भरला होता."जे लोकं एनडीए च्या घटक पक्षाचं इमानदारीने पालन करणार नाहीत, त्यांना एनडीएच्या माध्यमातून कारवाई करायला लावू," असा इशारा आमदार रवी राणा यांनी स्थानिक अमरावती जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांना दिला होता. येणाऱ्या काळात एनडीएचे घटक म्हणून सर्वजण खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असंही रवी राणा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन शिंदे आणि अजित पवार गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.
नवनीत राणा भाजपचं तिकीट मिळणार असल्याचं संकेत स्वत: नवनीत राणा यांनी दिले होते. परंतू महायुतीतील अनेक नेत्यांनी थेट राणा दाम्पत्याला आव्हान दिलं आहे. अमरावतीची जागा शिंदे गटाची असून आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ येथून लढणार आणि जर भाजपकडून राणांना उमेदवारी मिळाली तरी स्वत: अपक्ष म्हणून लढणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राजकीय विरोधक अभिजीत अडसूळ यांचा दारूण पराभव केला होता. शिंदे गट महायुतीत आल्यानंतर आता अभिजीत अडसूळ या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीत कोण कुणाचा प्रचार करणार, हे येत्या काही दिवसात समोर येईल.