भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. रोहितच्या वाढलेल्या वजनावर त्यांनी टिप्पणी करत त्याला लठ्ठ म्हटलं होतं. तसेच त्याला भारतीय इतिहासातील सर्वात 'अप्रभावशाली' कर्णधार ही म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजपनं जोरदार हल्ला चढवला होता. एकीकडे भाजपकडून टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या नेत्याने ही डॉ. शमा यांना खडे बोल सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका रोहितवर टीका होत असताना त्याच्या बचावासाठी दुसरा रोहित मैदानात उतरला आहे. दुसरा रोहित हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत. त्यांनी डॉ. शमा मोहम्मद यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांना क्रिकेटबाबत काय माहित आहे? त्यांनी कधी क्रिकेट खेळलंय का? हे सर्व खेळाडू प्रख्यात आहेत. ते देशाचे प्रतिनिधित्व करतात. राजकारणी होणे सोपे असते, मात्र खेळाडू म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणे हे सोपे नसते. असं रोहित पवार आवर्जुन म्हणाले.
त्यामुळे राजकारण्यांनी राजकारणावर बोलावे, खेळाबाबत बोलू नये, अशा शब्दात रोहित पवारांनी डॉ. शमा यांना सुनावलं आहे. मी रोहितचा फॅन आहे. त्यामुळे अशी विधाने करणे टाळले पाहिजे. शमा मोहम्मद यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी ही रोहित पवारांनी केली. रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहे. त्यांचा पक्ष हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. शिवाय रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ही आहेत.
ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...
भाजपने ही संधी सोडलेली नाही. पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, "काँग्रेसला लाज वाटली पाहिजे! आता ते भारतीय क्रिकेट कर्णधाराच्या मागे लागले आहेत! भारतीय राजकारणात अपयशी ठरल्यानंतर राहुल गांधी आता क्रिकेट खेळतील अशी त्यांची अपेक्षा आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शमा मोहम्मद यांनी केलेले विधान हे अत्यंत चुकीचे आहे. रोहित शर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, फिल्डींग करतो ते पाहाता त्याला जाडा म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान सर्व स्तरातून टीका होत आहे हे पाहील्यानंतर शमा यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मी रोहितचा अपमान करण्याच्या दृष्टीने हे ट्वीट केलेले नाही. मी फक्त रोहितच्या फिटनेसबाबत बोलले आहे. तो खेळाडू म्हणून लठ्ठ आहे असं मी म्हटलं आहे मी स्वत: खेळाडू असल्याने फिटनेसबाबत बोलते आहे. त्यात चुकीचे काय आहे? असा प्रश्नही शमा मोहम्मद यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावरून आणखी राजकीय वातावरण तापणार का ते पाहावं लागेल.