विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काही जण पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. अशातच अजित पवार स्वगृही परतणार अशी बातम्याही समोर येत आहेत. अशा वेळी अजित पवारांना पक्षा घेवू नये अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी घेतली आहे. धनगर समाजावर जानकर यांची चांगली पकड आहे. ही मागणी करत असताना जानकर यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांचा पळून गेलेला बिबट्या असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या टिकेने वाद होण्याचीही शक्यता आहे. त्यांच्या या टिकेला आता राष्ट्रवादी अजित पवार गट काय उत्तर देतो हेही पहावे लागणार आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तम जानकर यांनी शरद पवारांकडे आपली भावना व्यक्त केली आहे. जेव्हा जंगलाला आग लागली होती. त्या आगीने संपुर्ण जंगलाला आपल्या विळख्यात घेतले होते. त्यावेळी हत्ती, सिंह. घोडे जंगल सोडून पळाले होते. त्यावेळी आपला बिबट्याही जंगलातून पळाला होता. असे जानकर अजित पवारांचे नाव न घेता म्हणाले. त्यानंतर चिमण्यांनी आपल्या चोचीने पाणी आणून जंगलाला लावलेली आग विझवली. त्यानंतर आता हाच बिबट्या परत पक्षात येवू पाहात आहे. पण त्या पक्षात घेवू नका. तसे झाल्यास लोकांना भिती वाटते की हा परत आल्यास आपलीच शिकार करेल. अशा शब्दात जानकर यांनी अजित पवारांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुरूवातीच्या काळात उत्तम जानकर हे अजित पवारांबरोबर होते. मात्र लोकसभा निवडणुकीत ते शरद पवारां बरोबर आले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली. माढा लोकसभेत शरद पवार गटाचा खासदार निवडून आणण्यात त्यांचे योगदान मोठे होते. बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. इथेही जानकर यांनी अजित पवारां विरोधात प्रचार केला होता. शरद पवारां बरोबर अडचणीच्या काळात प्रामाणिक कार्यकर्ता राहीला असे जानकर सांगतात. जर अजित पवार पुन्हा पक्षात आले तर या प्रामाणिक कार्यकर्त्यांचीच शिकार करतील अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळाला. तर अजित पवारांच्या पारड्यात केवळ एक जागा आली. या निकालानंतर अजित पवार गटात हलचल निर्माण झाली. अनेकांनी शरद पवारांकडे परत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. अनेकांची घरवापसीसाठी चर्चाही सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी या आधीही अनेक जण संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यात अजित पवार गटाच्या काही आमदारांनी साहेब आणि दादांनी एकत्र यायला पाहीजे असे सांगितले होते. त्यानंतर अजित पवारांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती.