राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यात येत आहे. या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांसमोरच कार्यकर्त्यानं ही मागणी केली. जयंत पाटील सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत एका सामान्य कार्यकर्त्याचं भाषण सध्या व्हायरल होत आहे. या भाषणात त्यांनी पक्षाला वेळ देणारा नवा प्रदेशाध्यक्ष नेमावा अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील नसावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय केली मागणी?
'आपण सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या. प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला. सामान्य कार्यकर्त्यांना भेटणारा मराठा समाजाच्या व्यक्तीरिक्त तरुण नेत्याला संधी द्या. राज्यात वेगळं वातावरण चालू आहे, आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्त्वाचा फायदा घ्यायचा असेल तर जो अध्यक्ष पक्षासाठी वेळ देऊ शकेल त्या कार्यकर्त्याला संधी द्या. याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असं नाही. पण, नवीन तरुणांना संधी द्या अशी विनंती करतो.
प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकारिणीची एका दिवशी बैठक झाली पाहिजे. त्या दिवशी तालुका अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, आमदार, खासदार यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. तरच आपली संघटना राहिल नाही तर आपण फक्त कागदावरच मोठे दिसतो, प्रत्यक्षात मोठे दिसत नाहीत. आपण सर्वांनी काम केलं आणि पवार साहेबांसारखं नेतृत्त्व मिळालं तरच फायदा होईल,' असं मत या कार्यकर्त्यानं व्यक्त केलं.
( नक्की वाचा : शरद पवार-अजित पवार एकत्र येणार नाहीत, 5 महत्त्वाची कारणं )
कोण होणार प्रदेशाध्यक्ष?
अजित पवार यांनी पक्ष सोडल्यानंतर विधानसभेची पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत 8 जिंकत पक्षानं दमदार कामगिरी केली होती. पण, त्यानंतर काही महिन्यांमध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खूर्ची धोक्यात आली आहे.
आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे ही नावं आघाडीवर आहेत. पण, पक्षात अंतिम निर्णय शरद पवारांचाच असतो. त्यामुळे ते काय निर्णय घेणार? ऐनवेळी धक्कातंत्र देत नव्या चेहऱ्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.