जाहिरात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची बोचरी टीका; 'गुंगी गुडीया' शब्दावरून NCP आक्रमक, वातावरण तापलं!

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची बोचरी टीका; 'गुंगी गुडीया' शब्दावरून NCP आक्रमक, वातावरण तापलं!
Sunetra Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात थेट धडक दिली
मुंबई:

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.  या उल्लेखामुळे पेटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयात घुसून पत्रकार परिषदेदरम्यानच धुडगूस घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना 'गुंगी गुडीया' म्हटल्याने राज्यातील राजकारण भयंकर तापले असून राष्ट्रवादीने काँग्रेसकडे या अपमानाबद्दल जाहीर माफीची मागणी केली आहे.

बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार काहीच बोलल्या नाहीत, यावरून काँग्रेसने त्यांच्यावर 'गुंगी गुडीया' अशी बोचरी टीका केली होती.

काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादीची धडक

'गुंगी गुडीया' या शब्दावरून संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात थेट धडक दिली. तिथे सुरू असलेल्या पत्रकार परिषदेमध्येच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घुसून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना या वक्तव्यावर माफी मागण्यास सांगितले.

इंदिरा गांधींचा दाखला देत काँग्रेसला घेरले

काँग्रेसच्या या 'गुंगी गुडीया' वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अत्यंत कडक शब्दांत पलटवार केला. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी विरोधकांनी याच 'गुंगी गुडीया' शब्दाने हिणवले होते, याची आठवण करून देत त्यांनी काँग्रेसलाच उघडे पाडले. मग काँग्रेस आता इंदिरा गांधी यांच्यावरील त्या जुन्या टीकेचे समर्थन करते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाहीत धोरणांवर टीका करणे मान्य असले तरी महिलांसाठी अशी भाषा वापरणे काँग्रेसला शोभत नाही, असे सांगत त्यांनी हा शब्द मागे घेण्याची मागणी केली.

( नक्की वाचा : Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा )

नेमका कशामुळे सुरू झाला हा वाद?

बीडमधील एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारला असता सुनेत्रा पवार शांत राहिल्या. उलट तिथे उपस्थित राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखत होते, असा आरोप काँग्रेसने केला. या प्रसंगाचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडीया' म्हटले होते.

वाद ताणल्यानंतरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. 'गुंगी गुडीया' हा शब्द कोणतीही शिवी नसून ते सुनेत्रा पवार यांच्या जाहीर वर्तनाचे केलेले वर्णन आहे, असा दावा त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर कडक टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, असे सांगत हा संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मात्र या घटनेचा संदर्भ समजून घेणे गरजेचे असल्याचे म्हटले. पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखले जात असताना उपमुख्यमंत्र्यांकडे अधिकार असूनही त्या गप्प राहिल्या, असे सांगत रोहित पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला एक प्रकारे पाठिंबा दर्शवला. तसेच इंदिरा गांधी यांनीही आपल्या कर्तृत्वाने या 'गुंगी गुडीया' टीकेला उत्तर दिले होते, असा दाखला त्यांनी दिला.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com