Pune News : सोयी-सुविधांचा अभाव, यंत्र बिघाड अन् पोलिसांची अरेरावी.. मतदानादिवशीच नागरिकांनी घेतला मोठा निर्णय

नाणेकरवाडी–म्हाळुंगे जिल्हा परिषद गटातील महाळुंगे गावात जवळपास 3500 हजार मतदार असतानाही अवघ्या तीन मतदान यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड ताण निर्माण झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune ZP Election 2026 Updates
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Zp Election 2026 Updates : पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर सोयी-सुविधांचा अभाव,अपुऱ्या मतदान यंत्रणा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नाणेकरवाडी–म्हाळुंगे जिल्हा परिषद गटातील महाळुंगे गावात जवळपास 3500 हजार मतदार असतानाही अवघ्या तीन मतदान यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड ताण निर्माण झाला. यामुळे मतदारांना 2 ते 3 तास रांगेत उभे राहावे लागले. अशातच पुणे जिल्ह्यातील काही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे.

मतदान यंत्रणा बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प

अनेक मतदार कंटाळून मतदान न करताच घरी परतल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान,काही वेळ मतदान यंत्रणा बंद पडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. यावेळी प्रशासनाकडून ‘लाईट नसल्यामुळे मशीन बंद आहेत' असे कारण देण्यात आल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. यामुळे आधीच रांगेत उभ्या असलेल्या मतदारांचा संताप वाढला.

नक्की वाचा >> Pune News : मतदानाच्या दिवशीच पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळील व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 160 मतदारांनी..

मतदान केंद्रांवर पोलिसांकडून अरेरावी

याशिवाय काही मतदान केंद्रांवर पोलिसांकडून अरेरावी करण्यात आली, असा आरोपही करण्यात आला आहे. मतदानासाठी उत्साहात आलेल्या नागरिकांमध्ये दुपारनंतर निराशा पसरली असून निवडणूक यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारचा गैरव्यवस्थापनाचा फटका थेट मतदार सहभागावर बसत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.