संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News : भटक्या समुदायातील मांग गारुडी हा गावकुसाबाहेरचा समाज समजला जात होता. त्यांची अपराधिक पार्श्वभूमी पाहता त्यांना कुणी जवळ करत नव्हते. अनेकदा या समाजाला जातीचे दाखले मिळण्यासही अडचणी येतात, त्यामुळे आजही या समाजातील कित्येक जण शिक्षण, नोकऱ्यांपासून वंचित राहतात. परिणामी त्यांना कच्च्या पालांमध्ये, टिनाचे छत असलेल्या झोपड्यांमध्ये राहावं लागत होते.
पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या हक्कासाठी पुढे आले आहेत. तब्बल 100-150 वर्षांपासून कच्च्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मांग गारुडी समाजाच्या नागरिकांना नवीन पक्की घरे मिळवून दिली आहेत. ही दिवाळी या कुटुंबांसाठी आपल्या हक्काच्या घरातील पहिली दिवाळी आहे. त्यांच्या वस्तीत आता झोपड्या जाऊन नवीन घरे उभी राहत आहेत.
मांग गारुडी समाजातील नागरिकांकडूनही याबाबत आनंद व्यक्त केला जात आहे. एका लाभार्थी मुलीने नव्या घरासाठी आभार मानले. ती म्हणते, ही दिवाळी नव्या घरातील पहिली दिवाळी आहे. तीचे वडील रिक्षा चालक आहेत. आपलं कुटुंब त्यांच्या कमाईवरच चालतं. आता हक्काचं घर मिळाल्यामुळे त्याच्या डोक्यावरील मोठं टेन्शन कमी झालं आहे. आता काही जणांना घराच्या किल्ल्या देण्यात आल्या असून भविष्यातही अनेकांना याचा लाभ मिळेल. चाळीस पन्नास घरे उभी राहिली असून अन्य घरांची काम सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील रहाटे टोळीतील झोपड्या जाऊन तिथे आता पक्की घरे उभी राहत आहेत. काही घरांची कामे सुरू आहेत तर कित्येक घरे तयार झाली आहेत.मांग गारुडी समाजातील लोकांना नवीन घरं मिळणे हा त्यांच्या आयुष्यातील मोठा क्षण आहे. गावकुसाबाहेर असलेल्या वस्तीतील लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हक्काची नवीन घरे मिळाली आहेत. नवीन घरातील ही पहिली दिवाळी म्हणूनच खास आहे.