लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये केली घोषणा

Laxman Hake Hunger Strike : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Laxman Hake
वडीगोद्री, जालना:

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे.ओबीसी आरक्षणाचा कोटा मराठ्यांना देऊ नये या मागणीसाठी ते गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करत होते. जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये त्यांचं उपोषण सुरु होतं. मंत्र्यांच्या विनंतीनंतर हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं.आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली,असं हाके यांनी सांगितलं. त्यानंतर हाके यांनी हे उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. 

अधिवेशनाच्या काळात सर्वपक्षीय बैठकीत यामध्ये चर्चा करुन निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. आम्ही फक्त त्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही. आमच्या मागण्या  पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे, अशी घोषणा हाके यांनी केली.

लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्यासह वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.  

'सगेसोयरे आदेश रद्द करा' OBC शिष्टमंडळानं सरकारकडं कोणत्या मागण्या केल्या ? 

या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "मराठा समाजाला 'सरसकट ओबीसी' अशी मागणी मान्य करता येणार नाही. ती कायद्यातही बसणार नाही".पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली जाणार आहे. यामध्ये सगे सोयरेंबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे असेही भुजबळ यांनी सांगितले. खोटी सर्टिफिकेट कोणालाही दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. खोटे कुणबी दाखले दिले गेले असतील तर ते तपासले जातील असेही आश्वासन देण्यात आले, असं भुजबळांनी स्पष्ट केलं होतं.

Advertisement

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर ओबीसी नेत्यांनी लक्ष्मण हाके यांची वडीगोद्रीमध्ये भेट घेतली. त्यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलंय. आपण उपोषण स्थगित केलं असलं तरी हा लढा सुरुच ठेवणार असल्याचं हाके यांनी सांगितलं.