पहलगाम हल्ल्यानंतर भारतात दहशतवादाविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या कृत्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाचे पथक जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहे. सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवाद्यां विरोधात कारवाईची ठिकाण, वेळ आणि पद्धत सर्व काही सैन्यच ठरवेल असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे. ते म्हणाले, हे मोदींचे सरकार आहे, एक एक दहशतवाद्यांना शोधून त्यांचा नायनाट केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक गोष्टीला कठोर प्रत्युत्तर दिले आहे, मग ते ईशान्येकडील राज्य असोत, डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांचे क्षेत्र असोत किंवा काश्मीरमधील दहशतवादाच्या कारवाया असो. आम्ही त्यांना कठोर प्रत्युत्तर दिले आहे. भ्याड हल्ला करून जर कोणी मोठी विजय मिळवला, असे समजत असेल, तर लक्षात ठेवा की हे नरेंद्र मोदींचे सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. या देशाच्या प्रत्येक इंच जमिनीतून दहशतवाद उखडून टाकणे हा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल. असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
अमित शाह पुढे म्हणाले की या लढाईत केवळ 140 कोटी भारतीयच नव्हे, तर संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे. जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारताच्यासोबत उभे आहेत. अमित शाह पुढे म्हणाले की, जोपर्यंत दहशतवादाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना योग्य शिक्षा नक्की मिळेल. गुरुवारी दिल्लीतील कैलाश कॉलनीत बोडो नेते उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या सन्मानार्थ रस्ता आणि पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित शाह यांनी दहशतवाद्यांना थेट आव्हान दिले.
बोडो नेते उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या सन्मानार्थ बनवलेला रस्ता आणि पुतळ्याच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "...आज कैलाश कॉलनीमध्ये बोडोफा यांच्या सन्मानार्थ पुतळ्याचे अनावरण आणि रस्त्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. हा पुतळा केवळ बोडो समुदायासाठीच नव्हे, तर ज्या सर्व छोट्या जमातींनी आपली भाषा, संस्कृती आणि विकासासाठी संघर्ष केला, त्यांच्यासाठीही महत्त्वाचा आहे. बोडोफा यांचा पुतळा केवळ बोडो समुदायाचाच नव्हे, तर अशा सर्व लहान जमातींचा सन्मान वाढवतो..." अस शाहं यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Big News: महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करताय? थांबा! त्या आधी ही बातमी नक्की वाचा
बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा हे आसामचे महान नेते आणि समाजसुधारक होते. त्यांना बोडो लोकांचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी बोडो समुदायाच्या हक्कांसाठी, ओळखीसाठी आणि उन्नतीसाठी अनेक प्रयत्न केले. नवी दिल्लीत दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) दक्षिण दिल्लीतील लाला लजपत राय मार्गाच्या एका भागाचे नाव बदलून बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा मार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं.