सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Pimpri Chinchwad Municiple Corporation Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज छाननीनंतर एक मोठी खळबळजनक बाब समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २० 'ब' आणि ३० 'अ' मध्ये दोन उमेदवारांनी चक्क दोन-दोन राजकीय पक्षांचे 'एबी' फॉर्म जोडून अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, छाननीमध्ये हे दोन्ही अर्ज वैध ठरल्याने आता या उमेदवारांसमोर आणि निवडणूक आयोगासमोर मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.
दोन- दोन राजकीय पक्षांचे एबी फॉर्म...
प्रभाग क्रमांक २० 'ब' मधून नीलम म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशा दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म जोडले आहेत. दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ३० 'अ' मधून संदीप गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन परस्परविरोधी युतींमधील पक्षांचे एबी फॉर्म दाखल केले आहेत. तस पाहायला गेलं तर उमेदवाराने कोणत्याही एकाच पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी निश्चित करणे अपेक्षित होते.
मात्र, या दोघांनीही दोन्ही पक्षांचे फॉर्म सादर केल्याने ते सध्या कागदोपत्री दोन्ही पक्षांचे उमेदवार म्हणून दिसत आहेत. आज २ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या दोन्ही उमेदवारांकडे एका पक्षाची उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा पर्याय शिल्लक आहे. जर त्यांनी स्वतःहून एका पक्षाची निवड केली नाही, तर निवडणूक आयोग आपल्या नियमानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.
दुपारी तीन वाजता होणार निर्णय
जर या दोन्ही उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही, तर निवडणूक आयोग या पेचावर अंतिम निकाल लावेल. नियमानुसार, संबंधित उमेदवाराने ज्या पक्षाचा अर्ज आणि 'एबी' फॉर्म सर्वात आधी वेळेनुसार प्रथम दाखल केला असेल, त्याच पक्षाची उमेदवारी ग्राह्य धरली जाईल. दुसऱ्या पक्षाचा अर्ज आपोआप बाद ठरवला जाईल. त्यानंतर उमेदवारांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आता नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड हे आता नक्की कोणत्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरले जातात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.