जाहिरात

Political news: 'शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल करा', गोपीचंद पडळकरांनी आता ही मागणी का केली?

40 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला असं ही ते म्हणाले.

Political news: 'शरद पवारांविरोधात गुन्हा दाखल करा', गोपीचंद पडळकरांनी आता ही मागणी का केली?
मुंबई:

मारकडवाडीतील जनतेची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी केली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड, उपसरपंच आबाराजे मारकड, ग्रामपंचायत सदस्य शहाजी वाघमोडे, पवार गटाचे कार्यकर्ते दत्तात्रय मारकड, अभिजित देवकाते, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. ज्या मारकडवाडीत फेरमतदानासाठी आंदोलन झाले तेथील आंदोलनाचे कुटील कारस्थान शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांनी रचले होते असा आरोप पडळकर यांनी केला आहे. मारकडवाडीच्या सरपंच, उपसरपंचे ही हेच म्हणणे आहे असा दावाही पडळकर यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माळशिरस मधील मारकडवाडीमध्ये मविआच्या उमेदवाराला कमी मते मिळाली होती. त्यानंतर शरद पवार आणि मविआ नेत्यांनी मारकडवाडीत इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. राज्यात आणि देशभरात रान उठले होते. संविधानानाने निर्माण केलेल्या निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर, इव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचे पाप शरद पवार करत आहेत असं पडळकर म्हणाले. विधानसभा निकालाने व्यथित होऊन निकालाचे आणि मविआला मिळालेल्या कमी मतांचे खापर निवडणूक आयोग आणि इव्हीएमवर फोडायचा कुटील डाव शरद पवार, काँग्रेस व विरोधकांचा होता अशी टीका पडळकर यांनी केली.

नक्की वाचा - CIDCO News: घरांच्या किंमत कमी करण्याबाबत सिडको सकारात्मक, 22 हजार घरांची लॉटरी ही लवकरच

यावेळी मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड यांनी फेरमतदानाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामागे नक्की काय झालं होतं ते सांगितलं आहे. मारकड म्हणाले की, मारकडवाडी ग्रामस्थांना बळीचा बकरा करण्याचे काम शरद पवार आणि त्यांच्या हस्तकांनी केले असा आरोप त्यांनीही केला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना त्यांच्याच गावात अपेक्षेप्रमाणे मतदान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चलबिचल होती. त्यामुळे निकालानंतर मारकडवाडीत राष्ट्रवादी व काँग्रेस विरोधात कुठे कुठे मतदान झाले ते विस्तृत सांगा अशी विचारणा शरद पवारांच्या टीमने केली. ग्रामस्थांवर दबाव टाकत खोटे शपथपत्र घेतले असा दावाही सरपंचांनी केला. 

नक्की वाचा - Public Health Scheme: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेबाबत मोठी बातमी, सरकारने केला मोठा बदल

दिशाभूल करत आम्हाला महायुती आणि निवडणूक आयोगाविरोधात खोटी प्रतिक्रीया देण्यास भाग पाडले असेही त्यांनी सांगितले. मारकडवाडीत इव्हीएम घोटाळा झाला असा कांगावा करत लोकशाही, निवडणूक आयोग आणि गावाला बदनाम करण्याचा कट केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही या बाबतची वस्तुस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला असेही  मारकड म्हणाले. 40 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या गावात महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांचा धडाका लावत गावाचा चेहरामोहरा बदलला, त्यामुळे ‘ज्याचे खावे त्याला द्यावे' या न्यायाने गावातील अनेक वृद्ध आणि युवा मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले होते असं ही ते म्हणाले.  

नक्की वाचा - Google Gemini AI फोटो सोडा, रिंकू राजगुरू लग्नबाबत पहिल्यांदाच काय बोलली पाहा

विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसे मला भेटायला आली होती. त्यांनी 160 जागांवर मतांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्याचा  पडळकरांनी समाचार घेतला. शरद पवार हा कारस्थानांचा कारखाना आहे. देशाच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात विघातक कृत्य करण्यासाठी जर ते दोघे तुमच्याकडे आले होते, तेव्हा तुम्ही गृहमंत्र्यांना फोन करून का कळवले नाही? त्या दोघांना अटक करण्याची मागणी तुम्ही का केली नाही, असा सवाल पडळकर यांनी केला. पवारांनी असे काहीही न करता त्या दोघांना घेऊन ते राहुल गांधींकडे गेले. तेव्हा शरद पवार आणि राहुल गांधी यांनीच मारकडवाडी फेरमतदानाचे कारस्थान रचल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com