राजकीय पक्षांना वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींकडून पार्टी फंड दिला जातो. यावर्षी म्हणजे 2023-24 मध्ये कोणत्या पक्षाला किती पार्टी फंड मिळाला आहे याची आकडेवारी समोर आली आहे. या वर्षी सर्वात जास्त पार्टी फंड हा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तब्बल 2 हजार 244 कोटी पार्टी फंड भाजपला मिळाला आहे. आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे. सर्वात जास्त पार्टी फंड हा भाजपला मिळाला असताना सर्वात कमी पार्टी फंड हा तृणमुल काँग्रेसला मिळाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रा बरोबर अनेक राज्यात सध्या भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत. त्यामुळे पक्षासाठी निधी देणाऱ्या दात्यांनी मोठ्या प्रमाणात निधी हा भाजपला दिल्याचे दिसून येत आहे. 2023-24 या वर्षातील आकडेवारी आता समोर आली आहे. त्यानुसार दात्यांचा कल हा भाजपकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. भाजपला पार्टी फंड म्हणून 2 हजार 244 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र मागिल वर्षाच्या तुलनेत तिप्पट दान भाजपच्या पदरात पडले आहे. हे वर्ष निवडणुकीचे असल्याने भाजपच्या पदरात भरभरून दान पडल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
भाजप पार्टी फंडच्याबाबतीत देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असताना मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस पेक्षा तेलंगणाच्या बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीला जास्त निधी मिळाला आहे. बीआरएसला तब्बल 580 कोटीचा निधी मिळाला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस पेक्षा बीआरएसला मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळाल्याचे आता आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
भाजपनंतर सर्वाधिक डोनेशन हे चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मिळाले आहे. त्यात काँग्रेसचा नंबर कितवा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकेचे डोनेशन मिळाले आहे. या वर्षी काँग्रेसच्या पदरात 289 कोटीचे दान पडले आहे. मात्र मागिल वर्षीच्या तुलनेत ते तिप्पट असल्याचेही समोर आले आहे. मागिल वर्षी काँग्रेसला 79.9 कोटी डोनेशन मिळाले होते. त्यात या निवडणुकीत तिप्पट वाढ झाली आहे. काँग्रेस प्रमाणे भाजपच्या डोनेशनमध्येही तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे देशातल्या मुख्य दोन्ही पक्षांच्या डोनेशनमध्ये तिप्पट वाढ झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस भाजप प्रमाणे जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपीला 184 कोटी, चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला 100 कोटी, डीएमकेला 60 कोटी, तर अरविंदे केजरीवाल यांच्या आपला 11 कोटींचा निधी मिळाला आहे. सर्वात कमी निधी हा ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला मिळाला आहे. टीएमसीला 6 कोटींचा पक्ष निधी मिळाला आहे. राष्ट्रीय पक्षां बरोबरच प्रादेशिक पक्षांच्या पदरातही दान करणाऱ्यांनी भरभरून दान दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world