एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर? शिंदे- महाजन -पाटील यांच्यात चर्चा काय?

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्या दृष्टीनं खडसेंनी दिल्लीतही भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र खडसेंचा प्रवेश झाला तर काय? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजत आहे. या बैठकीत पुढची रणनिती काय असेल याचीही चर्चा झाल्याचं सुत्रांनी सांगितलं.   


खडसेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेचा विरोध? 
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे भाजपात आल्यास  येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत चर्चा केली होती. याबाबत मुख्यमंत्री धुळ्याला लग्नाला जात असताना जळगावात वेळ काढून चर्चेसाठी आले. खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास महायुतीत अडचणी निर्माण होतील. गेल्या तीस वर्षांपासून एकनाथ खडसें विरोधात असलेला राजकीय संघर्ष कायम राहणार असल्याचं यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. खडसे भाजपात आल्यानंतर माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुक्ताईनगर महायुतीत शिवसेनेलाच सुटेल याचा शब्दही त्यांनी घेतला आहे. 

Advertisement

मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  जळगावात येऊन महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना कशी मदत करता येईल याचा आढावा घेतला. शिवाय खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील संघर्ष कसा टाळता येईल, याबाबत तोडगा काढण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. याबाबत त्यांची पाटील यांच्या बरोबर चर्चा झाल्याचंही समजत आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कसा विजयी होईल यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. जिथं मतभेद आहेत तिथं नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची समजूत ते काढत आहेत. 

Advertisement

 
मुक्ताईनगरचं काय होणार? 
खडसे भाजपमध्ये परतणार असतील तर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचं काय होणार असा थेट प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. गेल्या ३० वर्षापासून आपण खडसें विरोधात संघर्ष करत आहोत. त्यामुळे भविष्यात खडसे भाजपमध्ये आले तर त्यांच्या मुलीसाठी भाजप हा मतदार संघ मागेल. मात्र हा मतदार संघ शिवसेनेकडेच राहील अशी हमी घ्या अशी मागणीही या बैठकीत पाटील यांनी केल्याचं समजत आहे. त्यामुळे पाटील यांनी आतापासूनच भविष्यातील राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी पाहात खडसेंचा पक्ष प्रेवश नक्की होणार की नाही याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे.