Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. या मागणीासाठी आग्रही असलेले नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी 'चलो मुंबई' चा नारा दिला आहे. त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. त्या टीकेला भाजपा नेत्यांनी उत्तर दिलंय.
मनोज जरांगे विरुद्ध भाजपा हा संघर्ष सुरु झालेला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत जरांगे-पाटील यांना प्रश्न विचारला आहे.'तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका.' असा सल्ला आंबेडकरांनी जरांगे यांना दिलाय.
काय म्हणाले आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ' मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.
( नक्की वाचा : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना, जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी सरकारचा निर्णय )
तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का?' असं आंबेडकर यांनी या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
मनोज जरांगेंचे आंदोलन कसे असेल?
दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाचे दर्शन घेवून मनोज जरांगे पाटील आपली कुच मुंबईच्या दिशेने करतील. आंदोलक गणपतीची मुर्ती ट्रकवर ठेवणार आहेत. हीच मुर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे. आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतला आहेत. स्वंयपाकी ही बरोबर असतील. किमान पंधरा दिवस आंदोलन करण्याची तयारी आहे. यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमीका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.