Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचा खळबळजनक दावा पुणे कोर्टात केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी केल्याचा आरोपाखाली राहुल गांधींवर पुणे कोर्टात खटला सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी हा गंभीर दावा केला आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी (13 ऑगस्ट) पुण्यातील कोर्टात सांगितले की, अलीकडील राजकीय संघर्ष आणि मानहानीच्या प्रकरणात तक्रारदार सत्यकी सावरकर यांची वंशावळ लक्षात घेता, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष खासदार/आमदार न्यायालयाला त्यांच्या सुरक्षेबाबत आणि खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीबाबत व्यक्त केलेल्या गंभीर शंकेची दखल घेण्याचे आवाहन केले.
गोडसेच्या वंशावळीचा उल्लेख
राहुल गांधी यांनी या अर्जात तक्रारदार सत्यकी सावरकर हे महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसेचे वंशज असल्याचं म्हंटलं आहे. त्यांनी या अर्जात सांगितलं की, 29 जुलै रोजी दाखल केलेल्या लेखी निवेदनात सत्यकी सावरकर यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे की ते महात्मा गांधींच्या हत्येतील मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांच्या मातेच्या बाजूने थेट वंशज आहेत आणि त्याच वेळी विनायक दामोदर सावरकर यांच्याशीही संबंधित असल्याचा दावा केला आहे.
अर्जात म्हटले आहे की, “तक्रारदाराच्या वंशावळीशी संबंधित हिंसक आणि असंवैधानिक प्रवृत्तींच्या दस्तावेजी इतिहासाच्या आधारावर, राहुल गांधींना हानी पोहोचवण्याची, चुकीच्या पद्धतीने अडकवण्याची किंवा इतर प्रकारे लक्ष्य करण्याची स्पष्ट, तर्कसंगत आणि पुरेशी भीती आहे.”
( नक्की वाचा : सावरकर आणि गोडसे यांच्यात रक्ताचं नातं, मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांचा नवा दावा! वाचा काय केले आरोप? )
महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख
राहुल गांधी यांनी या अर्जात महात्मा गांधींच्या हत्येचाही उल्लेख केला आहे. या अर्जातील दाव्यानुसार, महात्मा गांधींची हत्या ही कोणतीही तात्काळ केलेली कृती नव्हती, तर ती एका विशिष्ट विचारधारेत रुजलेल्या सुनियोजित कटाचा परिणाम होती, ज्याचा शेवट एका निशस्त्र व्यक्तीविरुद्ध योजनाबद्ध हिंसाचारात झाला. “अशा वंशावळीशी जोडलेला गंभीर इतिहास पाहता, बचाव पक्षाला खरी आणि तर्कसंगत भीती वाटते की इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली जाऊ नये.''
मत चोरीच्या आरोपामुळे राजकीय वैर वाढले
राहुल गांधी यांनी या अर्जात अलीकडील राजकीय हस्तक्षेपांचाही तपशील दिला आहे, ज्यात 11 ऑगस्ट रोजी संसदेत “वोट चोर सरकार” ही घोषणा आणि निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप असलेल्या कागदपत्रांचे सादरीकरण यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे आपले राजकीय विरोधक वाढल्याचा दावा त्यांनी केला.
( नक्की वाचा : कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस; 'मतचोरी'च्या आरोपांवर मागितले पुरावे )
दोन सार्वजनिक धमक्यांचाही उल्लेख
गांधींनी सांगितले की या भाषणानंतर लगेचच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हिंदू समुदायाचा अपमान केल्याचा आणि त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप केला. अर्जात दोन सार्वजनिक धमक्यांचाही उल्लेख आहे
राहुल गांधींविरोधात मानहानीचा हा खटला सत्यकी सावरकर यांनी दाखल केला होता. राहुल यांनी लंडनमध्ये मार्च 2023 मध्ये केलेल्या एका भाषणानंतर सावरकर यांनी हा खटला दाखल केला. राहुल यांनी या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप केले होते. 'ज्यात सावरकर आणि इतरांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्यानंतर त्यांना आनंद झाला होता,' या आरोपाचा समावेश आहे.