देशभरात आज (15 मार्च 2025) कांशीराम यांची जयंती साजरी केली जात आहे. उत्तर प्रदेशात चार वेळा सरकार चालवणाऱ्या बहुजन समाज पार्टीची स्थापना कांशीराम यांनीच केली होती. पंजाबमध्ये जन्म झालेल्या कांशीराम दलितांचा मोठे नेते मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमत्त अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. 'दलित, वंचित आणि शोषितांच्या अधिकारांसाठी त्यांचा संघर्ष, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये काँग्रेससाठी प्रत्येक पावलावर मार्गदर्शक असेल,' असं राहुल यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधी यांनी काय सांगितलं?
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साईट 'एक्स' वर पोस्ट केलीय. 'महान समाजसुधारक आदरणीय कांशीराम यांना जयंतीनिमित्तानं सादर नमन. दलित, वंचित आणि शोषितांच्या अधिकारांसाठी त्यांचा संघर्ष, सामाजिक न्यायाच्या या लढाईमध्ये प्रत्येक पावलावर आम्हाला मार्गदर्शक असेल.'
कांशीराम यांच्या जयंतीच्या दिवशी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय अर्थ आहेत. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी कांशीराम यांच्या बहुजन समाज पार्टीवर भाजपाची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. बसपा 'इंडिया' आघाडीत सहभागी झाली असती तर मागील निवडणुकीत एनडीएला विजय मिळाला नसता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल यांच्या आरोपाला मायावती यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसवर भाजपाची बी टीम म्हणून काम केल्याचा आरोप केला होता.