Raj Thackeray On Vidhansabha Result : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी निराशाजन झाली. गेल्या निवडणुकीत एक जागा मिळालेल्या मनसेला यंदा खातंही उघडता आलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे 'अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच..' असं ट्विट करणाऱ्या राज ठाकरे यांनी निकालावर पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राज?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण आज (3 डिसेंबर) झालं. या कार्यक्रमात बोलताना राज यांनी क्रिकेटचा संदर्भ देत राजकीय परिस्थितीवर टोलेबाजी केली. 'क्रिकेटमध्ये जसं सगळं बदलत गेलं, तसंच आमच्या राजकारणात देखील बदल झाले आहेत. क्रिकेटमध्ये अंपायरने आऊट दिल्यावर तो थर्ड अंपायर असतो. मला वाटतं गेल्या निवडणुकीच्या वेळी आम्हाला देखील थर्ड अंपायर मिळाला असता तर कदाचित अनेक निकाल बदलले असते,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी EVM, तसंच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. मनसे नेत्यांनीही निकालावर नाराजी व्यक्त केली होती. या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण त्यांचा शिष्य सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं. आचरेकर सरांचा शिष्य आणि क्रिकेटपटू विनोद कांबळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. या स्मारकाची संकल्पना राज ठाकरे यांची आहे.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
आचरेकर सरांचं योगदान खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांचं स्मारक व्हावं अशी माझी इच्छा होती. मला त्यांचा इथं पुतळा नको होतो. या स्मारकात स्टम्प,पॅड्स, बॅट ग्लोज या क्रिकेटसंबंधी वस्तू आहेत. त्याचबरोबर आचरेकर सरांची खास ओळख असलेली त्यांची टोपी आहे. क्रिकेट बदललं पण आजही आचरेकर सरांनी घडवलेले खेळाडू पाहिले की त्यांनी कशा पद्धतीनं संस्कार केले असतील, हे दिसतं असं राज यांनी सांगितलं.