विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. मात्र महाविकास आघाडी एकत्रीत पणे निवडणुकीला सामोरे जाईल. शिवाय संयुक्त नेतृ्त्व असेल असेही सांगितले जात होते. तर कधी काँग्रेस, कधी शिवसेना ठाकरे गट तर कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रिपदावर दावा करत होते. असं असलं तरी अंतिम निर्णय काही होत नव्हता. पण आता मविआमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यात मविआचा चेहरा कोण असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याला काँग्रेसनेही हिरवा कंदील दाखवल्याचे सुत्रांकडून समजत आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाबाबत काही कळवले नाही असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. मविआचा कोणी एक चेहरा नाही. सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल. राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे सर्व मिळून निवडणुकीला सामोरे जावू असं त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय करू असं ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!
विधानसभा निवडणुकीत मविआच्या प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रचाराचा प्रमुख चेहरा हा उद्धव ठाकरेच असतील. काँग्रेस हायकमांडनेही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र असं असलं तरी ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हेच मविआचे प्रचाराचे प्रमुख असतील याबाबत पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी कळवले आहे. शिवाय तशा सुचनाही दिल्या आहेत. त्याच बरोबर लहान पक्षांनाही महाविकास आघाडीत घ्या असे सांगण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - बारामतीतून अजित पवारांची माघार? निवडणूक न लढण्याचे कारण काय?
उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांच्याही भेटी घेतल्या. त्यातून मविआचा महाराष्ट्रातील चेहरा उद्धव ठाकरे असावेत हा संदेश दिला गेला. शिवाय तशी मोर्चा बांधणीही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा फायदा थेट काँग्रेसला झाला होता हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढली जावी याला काँग्रेसनेही हिरवा झेंडा दाखवला आहे.
ट्रेंडिंग बातमी - पंतप्रधान मोदींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; लाल किल्ल्यावर पुन्हा रचला इतिहास!
महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) प्रचाराचा नारळ 16 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. सकाळी 10.30 वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती ठरवली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे.